मुलांचे आजही शिक्षण भीतीच्या छपराखाली
By admin | Published: February 12, 2016 10:13 PM2016-02-12T22:13:18+5:302016-02-12T23:45:29+5:30
गुहागर तालुका : कोंडशृंगारी उर्दू शाळा भौतिक सुविधांपासून वंचित; दरड कोसळण्याचा धोका
शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कोंडशृंगारी उर्दू शाळेकडे जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा भौतिक सुविधांपासून वंचित आहे. शाळेला चिटकून गेलेली विजेची तार, संरक्षक भिंत व वर्ग खोल्यांच्या समस्यांनी शाळेला ग्रासले आहे. प्रशस्त जागा असूनही शाळेला संरक्षक भिंत नसल्याने दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे, पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, असे असताना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असलेल्या शाळेकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. याउलट गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे खासगी शाळांचे पेव फुटले असतानादेखील येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळेची पटसंख्या अडीचशेच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेला पालक पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. या शाळेची इमारत दोन्ही बाजुच्या रस्त्याला लागून असून, या मार्गावर कायम रहदारी असते. शाळेला लागून असलेले रस्ते तीव्र चढाचे आहेत. त्यामुळे वाहने वेगाने येतात. मात्र, याठिकाणी शाळेला संरक्षक भिंत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. कीचन शेडच्या मागे केव्हाही दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच भिंतीजवळ लहान मुलांचे खेळाचे साहित्य आहे, तर वेळंब रोडकडे जाणाऱ्या रस्त्याकडे शाळेला चिटकून विजेची तार गेलेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा हात या तारांना लागण्याची भीती आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला याविषयी कल्पना देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मुलांचा विजेच्या तारा, दरड व रस्ता अपघात होण्याच्या भीतीने जीव टांगणीला लागला आहे. संबंधित विभागाकडे याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे, मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)
सभापतींकडून दखल : प्रशासनाचे दुर्लक्ष
शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग कमी पडू लागले आहेत. दोन वर्ग एकत्र बसवून सध्या अध्यापनाचे काम सुरू आहे. शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र, डिजिटल शाळा अशा पोकळ गप्पा मारण्यापूर्वी शाळेला भौतिक सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती राजेश बेंडल यांनी शाळेची पाहणी केली होती. शाळेचे शौचालय व नवीन इमारत बांधकामाचा दर्जा पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यासोबत असणाऱ्या अभियंत्याने संरक्षक भिंतीची मापे घेतली होती. मात्र, सभापती बदलल्यानंतर हे काम थांबले आहे.