बालकांचे आजारपण वाढले; ओपीडीत झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:41+5:302021-08-26T04:33:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट अजूनही सुरू आहे. ही लाट ओसरत आली असली, तरीही संभाव्य तिसऱ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट अजूनही सुरू आहे. ही लाट ओसरत आली असली, तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका जागतिक आरोग्य क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व्यक्त होत असतानाच अचानक वातावरण बदलल्याने लहान मुलांमध्ये तापसरी, सर्दी-पडसे, खोकला आदी आजार बळावले आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीत बाल रुग्णांची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संकट अजुनही कायम आहे. त्यातच आता वातावरण बदलले आहे. याचा त्रास मुलांच्या आरोग्यावर होत आहे. येथील जिल्हा रूग्णालयात विविध आजारांनी त्रस्त असलेल्या बालकांची संख्या वाढू लागली आहे
कोरोनाबरोबरच बदलत्या वातावरणाचा धोका
कोरोनाची दुसरी लाट एकीकडे ओसरू लागली आहे. मात्र, साचून राहिलेले पाणी, ढगाळ वातावरण याचा प्रतिकूल परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे बालके मोठ्या प्रमाणावर या आजाराने ग्रस्त होत आहेत. मोठ्यांमध्ये कोरोना लसीकरण काही प्रमाणात झाले आहे. मात्र, मुलांना लस मिळाली नसल्याने त्यांची चिंता पालकांना अधिक वाटत आहे.
लक्षणे असलेल्या मुलांची कोरोना चाचणी
-पाऊस थांबला असून, अचानक उकाडा वाढल्याने तापसरी, सर्दी, खोकला या आजारांमध्ये वाढ.
-जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाल रुग्ण विभागात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. लक्षणे असलेल्या बालकांची कोरोना चाचणीही केली जात आहे.
बालरोगतज्ज्ञ म्हणतात...
सध्या कोरोनाची लाट ओसरू लागली असली, तरीही अन्य आजार वाढू लागले आहेत. मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले, तरी ताप, सर्दी, खोकला वाढू लागला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात बाल रुग्णांची संख्या वाढली आहे.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
लहान मुलांमध्ये सध्या तरी काेरोनाचे प्रमाण कमी असले तरी, सध्या पाऊस आणि एकंदरीतच बदलते वातावरण याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल होत आहे. सध्या ताप, सर्दी, खोकला यांनी मुले आजारी पडत आहेत.
- डाॅ. विजय सूर्यगंध, बालरोग तज्ज्ञ, रत्नागिरी
ही घ्या काळजी
मुलांना गर्दीत नेणे टाळा. बाहेर न्यायचे असल्यास काळजी घ्या. मुलांना बाहेर नेताना मास्क वापरायला द्या.
कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्यास तातडीने डाॅक्टरांना दाखवा आणि उपचार करा.
मुलांना सार्वजनिक ठिकाणी नेताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मुलांची काळजी घ्या.