मुलांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:47+5:302021-07-26T04:28:47+5:30
लख्ख दिसला तो शुभमला घेऊन या शाळेत येण्याचा पहिला दिवस. आज माझ्याएवढा उंच झालेला शुभम त्यावेळी इवलासा होता, हात ...
लख्ख दिसला तो शुभमला घेऊन या शाळेत येण्याचा पहिला दिवस. आज माझ्याएवढा उंच झालेला शुभम त्यावेळी इवलासा होता, हात धरून चालत होता. त्याची या शाळेतली सात वर्षे झरझर नजरेसमोर फिरली. तो पहिलीत गेला आणि सृष्टी त्याच शाळेत दाखल झाली. मग एकाला सोडायचं, दुसऱ्याला घेऊन यायचं, असा दिनक्रम सुरू झाला. शाळा जवळच असल्याने हा प्रवास बहुदा पायीच व्हायचा. नंतर नंतर स्कुटरवरून मुलांना आणण्याची मजाही आनंद देऊन जायची. आमचे बाबा इकडे आलेले असले की हे काम त्यांच्याकडे असायचं. पण ते जायचे पायीच. पावसाळ्यात प्रत्येक डबक्यात उडी मारून आलेली मुलं बघून मी हताश व्हायचे. बाबा मात्र गालातल्या गालात हसत असायचे.
शुभमला प्रत्येक इयत्तेत नवीन शिक्षक मिळाले. नर्सरी, छोटा शिशू, मोठा शिशू लागू बाईंकडे होतं. नंतर मग कारंडे सर, भांबिड बाई, मर्चंडे सर, भुवड सर या क्रमाने शिक्षक होते. हरेक शिक्षक आपापल्यापरिने वेगळे होते. सृष्टीला लागूबाई, भांबिडबाई आणि गमरे सरांनी शिकवले. मुलांवर संस्कार आणि पालकांशी संवाद असं शाळेचं गणित होतं. मला मम्मी म्हणणारा शुभम लवकरच आई म्हणायला लागला. सृष्टीच्या वेळी शाळा सेमी इंग्लिश झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक पण ती मात्र मम्मीच म्हणते. अर्थात बोलण्यापुरते संस्कार नव्हते तर सगळेच शिक्षक आपल्या वागण्यातून मुलांसमोर आदर्श उभे करत होते. कुणी मायेची मूर्ती होती तर कुणी शिस्तीचा पुतळा. कुणी धीरगंभीर स्वरात राष्ट्रगीत गायचं तर कुणी मल्लखांबावर लिलया कसरत करायचं. कुणी पोहण्यात पटाईत तर कुणाचं हस्ताक्षर मोत्यासारखं. शाळेचं मोठं पटांगण म्हणजे मुलांचा जीव की प्राण. शाळा सुटली तरी खेळ सोडून यायचं त्यांच्या जीवावर यायचं. खेळात मुलांनी फार नाही तरी थोडं नाव कमावलं होतं. पण त्याहीपेक्षा माझ्या दोन्ही मुलांनी शाळेच्या वक्तृत्व, पाठांतर, चित्रकला अशा सगळ्या स्पर्धांत नेहमीच भाग घेतला आणि बक्षिसं मिळवली. मला स्वतःला शाळेत शिकताना इच्छा असूनही भाषणाच्या स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. आपल्या अधुऱ्या इच्छा मुलांवर लादू नये हे खरं पण ती जर सहज आपल्या आवडीची एखादी गोष्ट करत असतील तर त्यातलं समाधान वेगळं असतं. शाळेच्या गॅदरिंगमध्ये तर हमखास सहभाग असायचाच. खरं म्हणजे सगळी मुलं कशा ना कशात भाग घेतील, याची काळजी शाळा आणि शिक्षक घेत असायचे. खेळ, गाणी, नाच सगळ्याचा सराव अगदी मनापासून घेतला जायचा. नर्सरीपासूनचे दोघांचे मित्र-मैत्रिणी डोळ्यांपुढे आले. त्यांची भांडणं, त्यांचं जीव लावणं, त्यांच्यातली स्पर्धा सगळं आठवलं. जाताना स्वच्छ असलेला युनिफॉर्म घरी येताना लालेलाल झालेला असायचा. मुलगा वरच्या शाळेत म्हणजे हायस्कूलमध्ये गेल्यानंतर या शाळेचं मुलांच्या आयुष्यातील महत्त्व आणखीच अधोरेखित झालं. त्या मानाने हायस्कूलमध्ये पाठ्यक्रम शिक्षणाचा बाऊ केलेला दिसतो आणि मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचे प्रयत्न अगदीच कमकुवत वाटतात. नशीबच की सुरुवातीच्या शिक्षणासाठी इतकी सुंदर शाळा माझ्या मुलांना मिळाली. या शाळेतला अत्युच्च आनंदाचा क्षण मात्र अगदीच दुर्मीळ असा होता. गॅदरिंग चालू होतं. कार्यक्रम होत होते, मधूनच बक्षीस वितरण सुरू होते. आदर्श विद्यार्थी पुरस्काराची घोषणा करताना मुख्याध्यापक उत्सुकता ताणत होते. अखेर त्यांनी नाव घोषित केलं - माझ्या मुलाचं! माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. अगदी अनपेक्षित. त्यांनी नंतर सांगितलं की, मुलांचा चार वर्षांचा इतिहास, त्यांचं एकंदर वर्तन, उपक्रम, सहभाग, यश आणि सर्व वर्गशिक्षकांचे मत यांचा विचार करून आदर्श विद्यार्थी निवडला जातो. तेव्हा माझी मान आपसूकच ताठ झाली. त्या रोमांचक क्षणी नेमके त्याचे बाबा काही कामात अडकले होते आणि त्या प्रत्यक्ष आनंदाला मुकले. सृष्टीचं चौथीचं पूर्ण वर्ष कोविड साथीमुळे वाया गेलं. तिसरी संपायच्या आधीपासून शाळेशी प्रत्यक्ष संबंध तुटला. शाळा ही केवळ इमारत नसते. तिथं शिक्षण होत असतंच. शिवाय अनेक समाजघटक एकत्र येऊन त्यांची घुसळण होण्याचं ते ठिकाण असतं. शिक्षणाचा हक्क असावाच. त्याचबरोबर शाळेत जायचादेखील असायला हवा. आज तो एका विषाणूने हिरावून घेतलाय. माणसं तो हिरावून घेणार नाहीत, याची काळजी घेणं आपल्या हातात आहे.
असं काही बाही डोक्यात घुसळत आम्ही वळून शाळेच्या गेटबाहेर पडलो. बाई म्हणाल्या होत्या,‘येत जा शाळेत, मुलं नसली तर काय झालं.’ मनात म्हटलं, ‘यायला हवं, पण येणार नाही हेही तितकंच खरं.’ शाळेला प्रत्यक्ष कधी नमस्कार केला नव्हता. आजसुद्धा मनातच केला.
- नीता पाटील,
दापोली