सततच्या लाॅकडाऊनने वाढविले मुलांचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:25+5:302021-03-25T04:29:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे मुलांच्या शाळा बंद राहिल्या. या कालावधीत शारीरिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे मुलांच्या शाळा बंद राहिल्या. या कालावधीत शारीरिक व्यायाम, खेळ बंद झाले. घरी वेळी-अवेळी खाणे वाढले, मोबाइलवर गेम सुरू झाले. त्यातच ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाल्याने घरात बसलेल्या मुलांचे वजन भरमसाठ वाढू लागल्याने पालकांच्या चिंतेचा विषय बनू लागला आहे.
साधारणत: दहा महिने घरात बसलेल्या मुलांच्या शाळा काहीअंशी सुरू झाल्या. मात्र, लहान वर्गातील मुले अजूनही घरीच आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात काहींच्या आयाही घरीच असल्याने या मुलांच्या हाती मोबाइल आले. खाणे वाढले. आता तर ऑनलाइन अभ्यास सुरू झाल्याने मुलं तासन्तास बसून राहत असल्याने वजन वाढू लागले आहे.
मुलांनी हे करावे...
मुलांनी घरात किमान एक तास व्यायाम करणे आवश्यक आहे. सायकल चालवावी, सूर्यनमस्कार घालावीत. दोरउड्या माराव्यात, घरगुती सकस आहार घ्यावा. घरातील खाणे खावे. आता बाहेर जाता येते त्यामुळे अंगणात विविध खेळ खेळावेत. जाॅगिंग करावे. अभ्यासापुरता मोबाइलचा वापर करावा.
मुलांनी हे टाळावे...
मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्त मोबाइलवर गेम खेळणे टाळावे. फास्ट फूड खाणे टाळावे. बिस्कीट आदी बेकरीतील खाणे कमी करावे. मोबाइलवर गेम खेळत एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नये. भूक लागली नाही तरी सतत खात राहणे टाळावे. टीव्ही, काॅम्प्युटरसमोर जास्त वेळ बसून राहू नये.
बालरोगतज्ज्ञांच्या मते या कारणांमुळे वाढतेय लहान मुलांचे वजन...
मुले घरातच राहिल्याने खेळ बंद झाले. टीव्ही, काॅम्प्युटर, मोबाइलवर गेम वाढले. ऑनलाइन क्लास सुरू झाल्याने बहुतांश जणांचा अभ्यास घरातच मोबाइलवर सुरू झाला. त्यामुळे आता पालकांनीही लक्ष द्यायला हवे. मुलांनी दोरउड्या, सूर्यनमस्कार, जाॅगिंग करायला हवे.
- डाॅ. संतोष बेडेकर
मुलांना मुळातच मोबाइलवर खेळणे यात इंटरेस्ट आहे. त्यातच ऑनलाइन वर्ग सुरू झाल्याने तर हातात मोबाइलच मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा मोबाइलवर दुप्पट वेळ जातोय. आईही घरी असल्याने नेहमीपेक्षा खाणेही वाढले आहे. त्यामुळे या मुलांचे वजन वाढत आहे.
- डाॅ. मेधा गोंधळेकर
मुले घरातच असल्याने ॲक्टिव्हिटी कमी आणि मोबाइलवर जास्त वेळ घालवत असल्याने वजन वाढले आहे. त्यातच घरात राहिल्याने सतत खाणे सुरू आहे. त्या तुलनेने व्यायाम काहीच नाही. त्यामुळे या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे.
- डाॅ. विजय सूर्यगंध