चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:05+5:302021-07-11T04:22:05+5:30

झोप वाढली, खेळामध्येच विशेष लक्ष, खातानाही लागतो मोबाईल मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे पहिली ते ...

Chimukalya's holiday mood remains | चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम

चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम

Next

झोप वाढली, खेळामध्येच विशेष लक्ष, खातानाही लागतो मोबाईल

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग गतवर्षी भरलेच नाहीत, यावर्षीही परिस्थिती ‘जैसे-थे’ आहे. गेले दीड वर्ष मुले घरीच आहेत. विशेषत: पहिली, दुसरीची मुले शाळेतच गेलेली नसल्याने त्यांना शाळा माहीतच नाही. घरात राहूनच ऑनलाईन अध्यापन सुरू असले तरी एका जाग्यावर ती स्थिर बसत नाहीत. पालकांना स्वत: तास सुरू असताना बाजूला बसावे लागत आहे. अभ्यासाच्या तासाला बसतानाही, मुले मध्येच खेळात रमत आहेत.

शाळा, शाळेतील वातावरण, शिक्षक, शाळेतील अध्यापन याबाबत मुले अनभिज्ञ आहेत. कोरोनामुळे घराबाहेर पालक पाठवत नसल्याने घरातच अन्य भावंडाबरोबर खेळ रंगत आहेत. ऑनलाईन तासाची वेळ झाल्याचे पालकांना ओरडून सांगावे लागत आहे. मोबाईलवर अभ्यासाची मानसिकता नसल्याने अभ्यासाबाबत पालकांनाच लक्ष द्यावे लागत आहे. मुलांना अक्षर ओळख, अक्षरे गिरवणे, अंक वाचन, अंक काढणे शिकवावे लागत आहे. मोबाईलवर अभ्यास असल्याने मुलांमध्ये मोबाईलची ‘क्रेझ’ निर्माण झाली असून, जेवतानाही मुलांना मोबाईल लागत आहे. कविता, अक्षर ओळख, अंक वाचनाचे व्हिडीओ मोबाईलवर पाठविण्यात येत असल्याने व्हिडीओ पाहतानाच मध्येच कार्टून्सची आठवण होत आहे.

एका जाग्यावर स्थिर बसत नाहीत

शाळेत मुले शिक्षकांना घाबरतात. त्यामुळे एका जाग्यावर जास्त वेळ बसू शकतात. ऑनलाईन अध्यापनात शिक्षक समोर नाहीत, ऑनलाईन अध्यापन सुरू असले तरी तासभर बसण्याची त्यांची मानसिकता नाही. उड्या मारणे, पळणे, मध्येच खेळ आठवतो. स्थिरता नसल्याने आम्हालाच अभ्यास समजून घेऊन तो करून घ्यावा लागत आहे.

- आफ्रीन खान, पालक, रत्नागिरी

शाळेत गेल्यावर मुलांवर वातावरणाचा परिणाम होतो. वर्गातील अन्य मुलांना पाहून त्यांचे अनुकरण केले जाते. ऑनलाईन अध्यापनात शिक्षक, मुलांमध्ये अंतर असून, वेळेची मर्यादा आहे. शिक्षक प्रयत्न करतात मात्र समजून घेण्याची मानसिकता नसल्याने पालकांवरची जबाबदारी वाढली आहे. तासाला बसायला मुले कंटाळा करत आहेत.

- भावना जोशी, पालक, रत्नागिरी

- शाळेत फळ्यावर लिहिलेले पाहून मुले वाचन करतात, लिहितात. ही सवय कायम राहावी, यासाठी पालकांनी घरातच छोटे फळे लावले आहेत.

- मुलांना अक्षरे, अंक ओळख व्हावी, यासाठी बाजारातून काही तक्ते आणून लावले आहेत, जेणेकरून येता-जाता ओळख व्हावी.

- पालक स्वत:च शिक्षकांच्या भूमिकेत जावून मुलांना शिकवत आहेत.

- शिक्षकांनी पाठवलेले व्हिडीओ पुन्हा-पुन्हा दाखवून मुलांकडून कविता, अक्षरे, अंकांचे पाठांतर करून घेतले जात आहे.

अभ्यासासाठी कारणे

- ऑनलाईन तासाची वेळ झाली तरी खेळ संपत नाही.

- पोटदुखी, डोकेदुखी, दातदुखीचे कारण सांगितले जाते.

- अभ्यासाला बसताना, पालकांकडून आमिषे दाखवली जातात, तेव्हा मुलेही अटीवर मान्य करतात.

- लिखाणाचा कंटाळा आला असेल, तर हात दुखत असल्याचे सांगितले जाते.

- जेवताना मोबाईल दिला तरच अंक पाठ करेन, असे बजावतात.

- खाऊसाठीही हट्ट धरला जातो.

Web Title: Chimukalya's holiday mood remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.