चिपळुणात दोन्ही काँग्रेसची भाजपला साथ
By admin | Published: December 29, 2016 12:04 AM2016-12-29T00:04:04+5:302016-12-29T00:04:04+5:30
उपनगराध्य निवडी : खेडमध्ये सेनेत बंडखोरी; दरेकर यांच्यावर कारवाई ?
रत्नागिरी : खेडमध्ये शिवसेनेत उपनगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान दुफळी माजली असून, बंडखोरीमुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार उभे ठाकले आहेत. चिपळुणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला उपनगराध्यक्ष पदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपला साथ दिल्याने अल्पमतातील भाजपला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. बुधवारी झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीत रत्नागिरीत राजेश सावंत (शिवसेना), खेडमध्ये सुनील दरेकर (शिवसेना) आणि चिपळुणात निशिकांत भोजने (भाजप) यांचा विजय झाला आहे.
खेडमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळाराम खेडेकर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्याचवेळी सुनील दरेकर यांनीही आपला अर्ज दाखल केला. या दोघांनाही समसमान म्हणजेच नऊ मते मिळाली. शेवटी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी त्यांचे निर्णायक मत दरेकर यांच्या बाजूने दिले. त्यामुळे दरेकर हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. यामुळे सेनेअंतर्गत दुफळी समोर आली असून, शिवसेना दरेकर यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
चिपळुणात अल्पमतात असलेल्या आणि थेट नगराध्यक्ष निवडीत विजयी झालेल्या भाजपला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने साथ दिली. त्यामुळे सर्वांत मोठा पक्ष असूनही शिवसेनेला उपनगराध्यक्षपदही मिळविता आले नाही. या ठिकाणी भाजपचे निशिकांत भोजने विजयी झाले आहेत.
रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजेश सावंत यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. रत्नागिरीत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळविल्याने या ठिकाणी कोणताही करिष्मा झाला नाही.