चिपळुणात आवळला जातोय सावकारीचा ‘फास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:38+5:302021-06-26T04:22:38+5:30
चिपळूण : चिंचनाका येथील एका रिक्षाचालकाने सावकारीतील धमक्यांना कंटाळून अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आता शहरात ...
चिपळूण : चिंचनाका येथील एका रिक्षाचालकाने सावकारीतील धमक्यांना कंटाळून अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आता शहरात सावकारीचा फास आवळत चालल्याचे स्पष्ट होत आहे. शहर परिसरात अनेक सावकारांनी आपली दुकाने उघडली आहेत. यातून ही आत्महत्या झाली असून आता पोलीस संबंधितांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे. आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाने दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या असून पोलीस कोणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
चिपळुणात सावकारी बोकाळली आहे. येथील पोलीस प्रशासन व सहकार खात्याचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले असून अनेक सावकार नागरिकांना वेठीस धरत असून या सावकारीतून लोकांचे संसार उघड्यावर येत आहेत. चिपळूणसारख्या शहरात अनेक राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, शेड्युल बँक, पतसंस्था यांचे मोठे जाळे असतानाही अनेक लोक सावकारीच्या जाळ्यात ओढले जात आहेत. तत्काळ आपल्याला पैसे मिळतात या आमिषाला बळी पडून अनेकांच्या गळ्या भोवती सावकारीचा फास आवळला जात आहे. शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मध्यंतरी आपण आत्महत्या करीत आहे, असे पत्र लिहून घरातून पळ काढला होता. मात्र त्याच्या सुदैवाने तो वाचला व जीवावर आलेले हे प्रकरण निभावले़ मात्र एका रिक्षा व्यावसायिकाने सावकारकच्या धमक्यांना कंटाळून अखेर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानंतर सावकारीचा मुद्दा चर्चिला जात आहे.
चिपळूण शहरातील चौकाचौकात अनधिकृतपणे सावकारी व्यवसाय करणाऱ्या लोकांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे़ यामध्ये काही व्यापारी, व्यावसायिक यांचाही सहभाग आहे. शहरातील अनेक जण या सावकारी धंद्यात गुरफटले गेले आहेत.
अनेकांनी वसुलीसाठी तरुण मुले ठेवली असून, दररोज सायंकाळी शहर परिसरात या सावकारांची जोरदार वसुली मोहीम सुरू असते. मात्र, त्याकडे अनेक तक्रारी होऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. आत्महत्या केलेल्या त्या रिक्षा व्यावसायिकाला मोबाईलवर फोन करून सातत्याने धमकावण्यात येत होते. वसुलीसाठी तगादा लावण्यात येत होता. त्यामुळे हे फोन कोणाचे होते ,कोण धमकी देत होते याचा उलगडा पोलीस तपासात होणार आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणी पोलीस कोणत्या पद्धतीने तपास करतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही शहरातील काही बेकायदा सावकारी करणाऱ्या सावकारांनी आपले सेंटर बंद केले आहे.
-----------------------
महिलांचा रुद्रावतार
चिपळुणातील रिक्षा व्यावसायिकाच्या आत्महत्येनंतर बेकायदा सावकारीचे अनेक धंदे शहरात सुरू असल्याची चर्चा आहे. अनेकांनी या आत्महत्येनंतर आपली दुकाने बंद केली आहेत. दरम्यान, शहरातील महिलांनी एका सावकारी करणाऱ्या व्यक्तीला भर बाजारपेठेत प्रसाद दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यानंतर या महिलांकडून आता दुसऱ्याचा समाचार घेतला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या रुद्र अवतारात दुसरा नंबर कोणाचा लागतो याची चर्चा सुरू आहे.