चिपळूण शहर काँग्रेसचा कडक लॉकडाऊनला तीव्र विरोधच : लियाकत शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:32+5:302021-05-30T04:25:32+5:30
चिपळूण : गेले वर्षभर व्यापारी, छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात पिचले आहेत. नोकरदारांचे हालहाल झाले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण ...
चिपळूण : गेले वर्षभर व्यापारी, छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात पिचले आहेत. नोकरदारांचे हालहाल झाले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण बनले असताना आता पुन्हा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन का, असा थेट प्रश्न उपस्थित करत चिपळूण शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण जास्त आहेत, त्याच ठिकाणी कडक लॉकडाऊन करा. संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरू नये, असेही त्यांनी ठणकावले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धिपत्रक दिले आहे़ शासनाचे लॉकडाऊन सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने आणखी कडक लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत शहा म्हणाले की, संपूर्ण देशात जसे लाॅकडाऊन केले नाही. तसेच संपूर्ण जिल्हा लाॅकडाऊन करू नये, ज्या तालुक्यात काेरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामध्ये शहर व ग्रामीण संख्या पाहून त्या ठिकाणी कडक लाॅकडाऊन करून काटेकोर पालन करावे. ग्रामीण भागात गावाप्रमाणे कंटेन्मेंट झोन करावे. रत्नागिरी जिल्हा राजापूरपासून मंडणगड महाडच्या टोकापर्यंत आहे. जर काेरोना रुग्णांची संख्या रत्नागिरी जास्त असेल, तर मंडणगड तालुका लाॅकडाऊन करून फार मोठा फायदा होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे़
याबाबतीत पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून संपूर्ण जिल्हा लाॅकडाऊन न करता ज्या शहरात रुग्णांची संख्या कमी आहे, तेथे १० ते ५ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. भविष्यात काही व्यापारी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतील, अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन हा विचार करू नये. अन्यथा, चिपळूण शहर काँग्रेस तीव्र विरोध करेल, असा इशारा शाह यांनी दिला आहे.