इंधन दरवाढीविरोधात चिपळूण काँग्रेसची जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:25+5:302021-06-09T04:39:25+5:30
चिपळूण : ‘बहुत हुयी महंगाई की मार, अब की बार बदलो सरकार, धिक्कार असो धिक्कार असो, केंद्र सरकारचा धिक्कार ...
चिपळूण : ‘बहुत हुयी महंगाई की मार, अब की बार बदलो सरकार, धिक्कार असो धिक्कार असो, केंद्र सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, काँग्रेस पक्षाचा विजय असो’, अशी जोरदार घोषणाबाजी करत चिपळूण शहर काँग्रेसने शहराध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. इंधन दरवाढ कमी झाली नाही, तर काँग्रेस थेट रस्त्यावर उतरेल, असा इशारादेखील शहा यांनी यावेळी दिला.
पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत तर डिझेलनेही नव्वदी पार केली आहे. या दरवाढीचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात आता जाणवू लागला आहे. महागाईचा जणू भडका उडाला आहे. कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना या महागाईमुळे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. दरवाढ अशीच कायम राहिली तर जगणे कठीण होईल. आगामी काळात फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागेल, याची दखल घेत काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष शहा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी सकाळी एकत्र आले. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून महामार्गावरील मेहता पेट्रोल पंपासमोर त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली.
यावेळी शहराध्यक्ष शहा यांच्याबरोबर नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेविका सफा गोटे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, अश्विनी भुस्कूटे, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, महेश मांडके, नियाज सनगे, रिजवान पटेल, साजिद सरगुरोह, अ. ल. माळी, सचिन गायकवाड, अभिजीत कांबळे, महिला शहराध्यक्ष श्रद्धा कदम, हुजैर घारे, नाईक तांबे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------
इंधन दरवाढीविरोधात चिपळुणात मेहता पेट्रोल पंप येथे शहर काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.