Ratnagiri: चिपळूणची जागा उद्धवसेनेने सोडली?, ‘मातोश्री’वरील बैठक अचानक रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 03:18 PM2024-09-30T15:18:18+5:302024-09-30T15:18:38+5:30
जागा कोणाच्या वाटेला?
रत्नागिरी : जिल्ह्यातील उद्धवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या ‘माताेश्री’वरील बैठकीत चिपळूण मतदारसंघाची बैठक अचानक रद्द करण्यात आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चिपळूण दाैऱ्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साेडण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जिल्ह्यात चिपळूण वगळता चारही आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र, राजकीय स्थित्यंतरानंतर चिपळूणचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबत तर दापाेली, रत्नागिरीचे आमदार शिंदेसेनेसाेबत गेले आहेत. त्यामुळे सध्या उद्धवसेनेकडे दाेन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला देण्याचे महाविकास आघाडीने निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच जागांपैकी चिपळूण वगळता उर्वरित चार जागा उद्धवसेनेला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘माताेश्री’वर इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीत राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापाेली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र, चिपळूणबाबतची बैठक अचानक रद्द करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर चिपळूणची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साेडण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
रत्नागिरीबद्दल ‘वेट ॲण्ड वाॅच’
बैठकीत विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात उद्धवसेनेचे प्राबल्य कसे राहील, यावर चर्चा करण्यात आली. पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी गतीने कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, रत्नागिरी मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराविषयी काेणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराबाबत अजूनही ‘वेट ॲण्ड वाॅच’ आहे.
गुहागरात काेण चालेल?
गुहागर मतदारसंघाबाबत मिलिंद नार्वेकर व विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी भास्कर जाधव अथवा विक्रांत जाधव यांच्यापैकी तुम्हाला काेण चालेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पदाधिकाऱ्यांनी काेणी चालेल, असे सांगितले.