चिपळुणात कोरोना बळींचे दि्वशतक पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:46+5:302021-05-07T04:33:46+5:30
चिपळूण : कोरोनाचा कहर चिपळूण तालुक्यात वाढतच आहे. सोमवारी रुग्णसंख्या १५ पर्यंत आल्याने मिळालेला दिलासा, मंगळवारी आतापर्यंत एकाच दिवसातील ...
चिपळूण : कोरोनाचा कहर चिपळूण तालुक्यात वाढतच आहे. सोमवारी रुग्णसंख्या १५ पर्यंत आल्याने मिळालेला दिलासा, मंगळवारी आतापर्यंत एकाच दिवसातील तब्बल २४६ इतकी उच्चांकी बाधित रुग्णांची नोंद झाल्याने संपुष्टात आला आहे. १ मेपासून अवघ्या चार दिवसात तब्बल ४३० रुग्ण आढळले असून, कोरोना बळींनी दि्वशतक पार केले आहे.
एप्रिल महिना कोरोनाच्या भीतीखाली गेल्यानंतर मेच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णसंख्या शंभरच्या खाली येऊ लागली होती. त्यामुळे काहीसे दिलासादायक चित्र निर्माण होत असतानाच मंगळवारी तब्बल २४६ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागात ‘हॉट स्पॉट’ गावांची संख्याही वाढत आहे. तालुक्यात एकूण ७ गावे कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ जाहीर केली आहेत. मांडकीसह मुंढेतर्फे सावर्डे, पिंपळी खुर्द, वालोपे, पोफळी, चिंचघरी आदी ६ गावे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी कोरोना ‘हॉट स्पॉट’ म्हणून जाहीर केली आहेत. त्यानंतर आता तालुक्यातील अन्य भागातही रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
सध्या तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १,४२२ इतकी आहे. आतापर्यंत २०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी १०१९ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. बाजारपेठेत दुकाने उघडी ठेवल्यास थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
फोटो -
चिपळूण बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.