चिपळूणचा पराभव सेनेच्या जिव्हारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:15 PM2019-10-31T18:15:07+5:302019-10-31T18:18:00+5:30
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सेनेचे संघटन पूर्णत: अडचणीत आले आहे.
चिपळूण : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सेनेचे संघटन पूर्णत: अडचणीत आले आहे.
यावेळची विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थाने अटीतटीची झाली. या विधानसभा निवडणुकीत सेनेने जिल्ह्यात भाजपला जराही संधी न देता पाचही जागांवर उमेदवार दिले. या पाच जागांपैकी चिपळूणची जागा खात्रीशीर निवडून येणार, असे सेनेला तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही अपेक्षित होते.
गेली दहा वर्षे चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघात सेनेला ताकद देण्याचे काम माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केले. चिपळूणचे आमदार म्हणून सलग दोन वेळा विजय मिळविला आहे. मात्र, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच जागांपैकी एकमेव चव्हाण यांचा पराभव झाल्याने त्याचा जोरदार धक्का येथील शिवसैनिकांना बसला आहे. त्यांच्या या पराभवावर अजूनही येथील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा विश्वास बसत नाही. यातूनच शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
शहरप्रमुखांच्या राजीनाम्यानंतर तालुकाप्रमुख शिंदे यांनीही तितक्याच घाईघाईने राजीनामा दिला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार चव्हाण यांनी शिवसैनिकांना खचून जाऊ नका, असे आवाहन केले होते.
एवढेच नव्हे, तर लक्ष्मीपूजनानिमित्ताने त्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन तातडीने पुढील कामाला सुरुवात केली आहे. असे असताना शहरप्रमुख उमेश सकपाळ आणि त्यांच्या पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने येथील शिवसैनिक पूर्णत: खचून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नुक त्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सेनेचा बालेकिल्ला असलेल्या चिपळुणातून चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सेनेत उलटसूलट चर्चा सुरू आहे. अशातच मतदार संघातील पकड कमी होऊ नये यासाठी गेली दहा वर्षे आमदार म्हणून मतदार संघातसहीत जनतेच्या संपर्कात असणाऱ्या माजी आमदार चव्हाण यांचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी युवा सेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.