चिपळुणात निवडणुकीची नांदी

By admin | Published: August 24, 2016 10:31 PM2016-08-24T22:31:38+5:302016-08-24T23:45:17+5:30

राजकीय धुळवड : सदानंद चव्हाण-पालिकेत निषेध युध्द

Chiplun elections | चिपळुणात निवडणुकीची नांदी

चिपळुणात निवडणुकीची नांदी

Next

सुभाष कदम -- चिपळूण -नगरपरिषदेची निवडणूक १६ डिसेंबरला होणार आहे. त्याची नांदी आमदार सदानंद चव्हाण विरूद नगर परिषद यांच्यातील निषेध युद्धाने झाली आहे. येथील आमसभेत सभाध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण यांनी नगर परिषदेच्या निषेधाचा ठराव मांडला आणि नगर परिषदेतर्फे मंगळवारी त्या ठरावाचा निषेधही करण्यात आला.
चिपळूणची आमसभा शुक्रवारी झाली. या आमसभेत नगरसेवक अविनाश केळसकर यांनी मागासवर्गीय निधी खर्ची पडत नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे उत्तर नगरसेवक केळसकर यांना पटले नाही. नगरसेवक केळसकर यांना आपण पालिकेचे सन्माननीय सदस्य आहात, हा प्रश्न आपण तेथे विचारून माहिती घ्यायला हवी होती, असे आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले. परंतु, नगरपरिषदेच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. आपल्याकडेही अनेकांनी तक्रारी केल्या आहेत, त्यामुळे त्यांनी नगरपरिषदेच्या कारभाराच्या निषेधाचा ठराव केला. खरेतर हा ठराव करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, आवश्यक ती माहिती घेऊन आमदार चव्हाण यांनी हा ठराव केला असता तर त्याला अधिक अर्थ प्राप्त झाला असता.
नगराध्यक्षा सावित्री होमकळस, गटनेते राजू कदम व पालिकेच्या आजी-माजी सभापतींनी आमदार चव्हाण यांच्या निषेध ठरावाचा निषेध केला. हा ठराव करताना त्यांनी मागासवर्गीयांसाठी प्रतिवर्षी झालेल्या खर्चाचा आढावा पत्रकारांसमोर मांडला. आमदारांनी माहिती घेऊन निषेधाचा ठराव मांडायला हवा होता, असे सांगतानाच आमदार चव्हाण यांनी पालिकेसाठी किती निधी उपलब्ध करुन दिला.
शहराच्या विकासासाठी किती आढावा बैठका घेतल्या? त्या एकदा जाहीर कराव्यात, असे आव्हान सत्ताधाऱ्यांनी दिले. शिवाय आमदारांच्या नातेवाईकांनी पालिका आवारातील अपूर्ण ठेवलेल्या कामात एकदा आमदारांनी लक्ष घालावे, असेही सांगितले.
एकूणच आमसभेत झालेला ठराव हा नगरपरिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेला आहे. त्यामुळेच आता या उखाळ्यापाखाळ्या सुरु झाल्या आहेत. निवडणुका जवळ येतील तसतसे आरोप-प्रत्यारोप वाढत जातील, हा निसर्गनियम आहे. त्यामुळे पुढील काळ हा नागरिकांसाठी करमणुकीचा ठरणार आहे. आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडतानाच राजकीय पक्षांमधील नैतिक पातळी व परिपक्वतेचे दर्शनही घडणार आहे. त्यामुळे आमसभेतील निषेधाच्या ठरावाने काय साधणार हे काळच ठरवेल. आज तरी हा ठराव राजकीय असल्याचीच चर्चा आहे.

शीतयुध्द : राजकीय वर्तुळात ठरलाय चर्चेचा विषय
चिपळूण नगरपरिषद आणि आमदार सदानंद चव्हाण यांच्यात सध्या निषेध युध्द सुरु आहे. त्यामुळे निषेध ठराव हा चिपळुणातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी झालेल्या आमसभेत आमदार सदानंद चव्हाण यांनी निषेध केला आणि या ठरावाचा निषेध त्यानंतर लगेचच नगर परिषदेने केला. या निषेधाच्या ठरावामुळे आमदार आणि नगर परिषद यांच्यात चांगलेच शीतयुध्द पेटले आहे.

Web Title: Chiplun elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.