चिपळुणात शेतकऱ्यांना अवजारांसाठी दाखवले जातेय आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:24+5:302021-07-11T04:22:24+5:30
चिपळूण : कृषी विभागाकडून शेतीकामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रे व अवजारे ४० ते ५० टक्के अनुदानावर दिली जातात. त्यासाठी कृषीची ...
चिपळूण : कृषी विभागाकडून शेतीकामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रे व अवजारे ४० ते ५० टक्के अनुदानावर दिली जातात. त्यासाठी कृषीची ऑनलाईन प्रकिया सुरु आहे. असे असताना तालुक्यातील काही खासगी अवजारे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविण्याचा नवा फंडा सुरु केला आहे. हे विक्रेते शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अवजारे खरेदी करण्यास भाग पाडत असल्याचे पुढे येत आहे. शेतकऱ्यांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.
गेल्या काही वर्षांत कालानुरुप शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्याने एकेकाळी उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेती सद्यस्थितीत ओसाड झाली आहे. कृषी विभागाने नव्या योजनांची जोड देत शेतकऱ्यांना अत्याधुनिक पध्दतीने शेती लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसेच शेतमजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न सुटून मजुरांच्या जागी यंत्राचा वापर करावा, या उद्देशाने कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना खऱ्याअर्थाने राबविण्यात आली.
या योजनेतून शेतीकामासाठी आवश्यक असणारी विविध यंत्रे व अवजारे ही ४० ते ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिली जातात. ही योजना कृषी विभागाने २०२० - २१ या वर्षापासून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यास सुरुवात केली. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची छाननी व सोडत ही कृषी आयुक्तालय, पुणे येथे होते. या सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थींना त्यांनी अर्ज केलेल्या यंत्राकरिता अनुदान दिले जाते, अशी या योजनेची प्रकिया आहे. असे असतानाच तालुक्यातील काही खासगी यंत्रे व अवजारे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविण्याचा नवा फंडा सुरु केला आहे. त्यासाठी हे विक्रेते त्यांच्याकडील यंत्रे व अवजारे शेतकऱ्यांना खरेदी करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार घडत आहे.
-------------------------------
ही अवजारे खरेदी करुनही संबंधित शेतकऱ्यांना त्यासाठीचे अनुदान मिळत नाही. त्यानंतर हे शेतकरी कृषी विभागाला दोष देत उलट त्यांच्याकडेच अनुदानाची मागणी करत असल्याचा प्रकार घडत आहे. कोणत्याही खासगी विक्रेत्यांनी अनुदानाबाबत आमिष दाखवल्यास त्याला न भुलता त्यांच्याकडील अवजारे खरेदी करू नयेत. तसेच याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यक तसेच कृषी विभागाकडे तत्काळ संपर्क साधावा.
- राहुल आडके, तालुका कृषी अधिकारी.