Chiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:32 PM2021-07-27T17:32:58+5:302021-07-27T17:33:47+5:30
Chiplun Floods: चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल कोश्यारी मंगळवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते.
रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर ही दुर्दैवी वेळ आली आहे, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत सूचना दिल्या. धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी व्यापाऱ्यांशी बोलताना सांगितले.
चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल कोश्यारी मंगळवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल. त्यासाठी केंद्राचे एक पाहणी पथक लवकरच दौरा करेल. संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार आशिष शेलार, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीत राज्यपाल महोदयांनी प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदत कार्य याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पूरपरिस्थिती व प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती राज्यपाल महोदयांना दिली. त्याचप्रमाणे सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली. हे मदत कार्य असेच सुरू राहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकास शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी, अशा सूचना यावेळी राज्यपालांनी केल्या.