चिपळूण, खेडमध्ये जलप्रलय, जनजीवन ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 10:15 AM2019-07-27T10:15:19+5:302019-07-27T10:15:43+5:30
संततधार अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथे पूर आला आहे. या दोन्ही शहरातील मुख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत.
रत्नागिरी - संततधार अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथे पूर आला आहे. या दोन्ही शहरातील मुख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. जगबुडी आणि वाशिष्ठी नदीचे पाणी वाढल्याने मुंबई-गोवा महामार्ग अजूनही बंदच आहे.
गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. चिपळूणमध्ये मध्यरात्रीपासून बाजारपेठेत पाण्याची पातळी वाढू लागली. पहाटे चार वाजता बाजारपेठेत पाणीचपाणी झाले होते. खेर्डी येथेही रस्त्यावर पाणी असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
चिपळूणप्रमाणेच खेड येथेही बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. खेडमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासूनच जगबुडीने धोक्याची पातळी गाठली होती. शहराच्या बाजारपेठेत रात्रीच पाणी शिरू लागले. पावसाचा जोर कायम राहिल्याने पहाटेच्या सुमारास बाजारपेठ पाण्याखाली गेली.