चिपळूण उड्डाणपूल दुर्घटना: ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस; केंद्रीय समितीही पाहणी करणार
By संदीप बांद्रे | Published: October 18, 2023 06:27 PM2023-10-18T18:27:21+5:302023-10-18T18:28:30+5:30
लवकरच याबाबत सत्य उघड होण्याची शक्यता
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेखनाका येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम करणारी मूळ ठेकेदार कंपनी तसेच पोट ठेकेदार कंपनी व संबंधित सल्लागार कंपनीला देखील शासनाने करणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात केंद्रीय समिती देखील चिपळूण मध्ये येणार असून पाहणी करणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल दुर्घटनेची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतल्याचे आता समोर येऊ लागले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख ते प्रांत कार्यालय असा सुमारे १.८३ किलोमीटर चा उड्डाणपूल उभारला जात आहे.पुलाच्या पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू असतानाच सोमवारी दुपारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यामुळे साहजिकच कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या. लोकांनी देखील यासंदर्भात जोरदार आवाज उठवल्याने राजकीय व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यकर्ते तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील याबाबत दखल घेतली.
आता शासनाने थेट दखल घेतली आहे. या उड्डाणपुलाचा मूळ ठेका एका ठेकेदाराकडे तर पोट ठेका दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आला आहे. आता शासनाने दोघांनाही कोंडीत पकडले आहे. मूळ ठेकेदार तसेच पोट ठेकेदाराला देखील पूल कोसळल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसमध्ये अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले असल्याची देखील माहिती मिळत आहे. कारणे दाखवा नोटीस मिळताच ठेकेदार कंपनीचे धाबेच दणाणले आहेत.
राज्य शासनाने दखल घेतल्यानंतर आता केंद्र शासनाने देखील आता गंभीर दखल घेतली आहे. येत्या दोन दिवसात केंद्रीय समिती चिपळूणमध्ये येत असून कोसळलेल्या उड्डाणपुलाची पाहणी ही समिती करणार आहे. पाहणीनंतर समिती आपला अहवाल केंद्राला सादर करेल. त्यानंतर केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून देखील कारवाई होण्याची श्यक्यता आहे. केंद्र आणि राज्य शासनाने देखील आता चिपळूणच्या उड्डाणपुलाची दखल घेतल्याने लवकरच याबाबत सत्य उघड होण्याची शक्यता आहे.