चिपळुणात मियावाकी जंगल पद्धतीनुसार जंगल विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 03:41 PM2020-09-03T15:41:48+5:302020-09-03T15:42:49+5:30
कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घालणाऱ्यांना रोखण्याकरीता यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावे लागेल. मात्र, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले.
चिपळूण : निसर्गाविषयी आतापासूनच संवेदनशील झालो नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही. यापुढे पाणीच नव्हे तर ऑक्सिजनही विकत घ्यावे लागेल. त्याची चुणूक आतापासूनच दिसू लागली आहे. कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घालणाऱ्यांना रोखण्याकरीता यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावे लागेल. मात्र, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. तसेच कोकणातील स्वदेशी वाणांची सीड बँक सुरू करून शेतकऱ्यांना मोफत बी-बीयाणे उपलब्ध करावीत, असे आवाहनही केले.
येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्था व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरालगतच्या धामणवणे येथे ज्येष्ठ व्यापारी श्रीराम रेडीज यांच्या सुमारे १०० एकर जागेत जपानमधील तज्ज्ञांच्या मियावाकी जंगल पद्धतीनुसार जंगल विकसित करण्यात येणार आहे.
या कामाचा शुभारंभ बुधवारी प्रसिद्ध अभिनेते अनासपुरे यांच्याहस्ते राज्यवृक्ष ताम्हणच्या लागवडीने काढण्यात आले. यानंतर आमदार शेखर निकम यांच्याहस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. याठिकाणी सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
त्यानंतर आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, शासनामार्फ चुकीच्या पद्धतीने विदेशी जातीच्या वृक्ष लागवडी केल्या जात असल्याने त्याचा घातक परिणाम निसर्गावर होत आहे. त्यासाठी लवकरच शासनाचे लक्ष वेधले जाईल. तत्पूर्वी शेतकरी किंवा बागायतदारांनी वृक्ष लागवड करताना स्थानिक जातीच्या वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन केले.