चिपळूण, खेडची पावसाची सरासरी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:36 AM2021-08-24T04:36:33+5:302021-08-24T04:36:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ...

Chiplun, Khed's average rainfall dropped | चिपळूण, खेडची पावसाची सरासरी घसरली

चिपळूण, खेडची पावसाची सरासरी घसरली

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ३६६.६८ मिलिमीटर जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, यावर्षी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या चिपळूण व खेडमध्ये मात्र गेल्यावर्षीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे मिळालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये श्रावण सरी कोसळत असून, ऊन आणि पावसाचा खेळ अनुभवायला मिळत आहे. जुलै महिन्यातील पावसाच्या धुवाॅंधार विक्रमी नोंदीनंतर आता गणेशोत्सवाचे वेध लावणारे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे. दि. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात हाहाकार उडाला होता. इतिहासाच्या पानातील पर्जन्यमानाच्या नोंदी पाऊस मोडणार, असे अंदाज अनेक तज्ञांनी मांडले होते. रायगडमधील महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळून अनेकांचे जीव गेले तर कोट्यवधी रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसानदेखील झाले आहे. परंतु, हाहाकार उडवणाऱ्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या खेड व चिपळूण तालुक्यांना बसला त्या तालुक्यांत गतवर्षीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी खेडमध्ये ४,०७४ मिलिमीटर तर चिपळूणमध्ये ३४०१.९२ एवढी पावसाची एकूण नोंद झाली होती. परंतु, यावर्षी दि. १ जून ते दि. २२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खेडमध्ये ३३६७.८० मिलिमीटर तर चिपळूणमध्ये २८७७.९० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये मंडणगड - ३०२६.५०, दापोली - २५५९.८०, गुहागर - ३०२४.९०, संगमेश्वर - ३०८८.८०, रत्नागिरी - ३१७०.६०, लांजा - २९८४.९०, राजापूर - २७९२.९० असा एकूण पाऊस नोंदविण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गेल्यावर्षीपेक्षा अधिक सरासरी गाठल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. खेडमधील नातूवाडी धरण ८६.५६ टक्के भरले असून, धरणात २३.५६९ द. ल. घ. मी. पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील गडनदी संगमेश्वर धरण - ८०.०८ टक्के, अर्जुना राजापूर धरण - १०० टक्के, मुचकुंदी लांजा धरण - १०० टक्के भरले आहे.

--

Web Title: Chiplun, Khed's average rainfall dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.