महागाई विरोधात चिपळूण दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:31 AM2021-03-26T04:31:51+5:302021-03-26T04:31:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : ‘कमी करा, कमी करा, इंधन दरवाढ कमी करा’, ‘चले जाव, चले जाव, मोदी सरकार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : ‘कमी करा, कमी करा, इंधन दरवाढ कमी करा’, ‘चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा देत आठ बैलगाड्या, हातगाडीवर पेटविलेली चूल आणि लाकडाची मोळी घेतलेले नागरिक अशा आगळ्या वेगळ्या थाटात चिपळूण काँग्रेसने महागाई विरोधात काढलेल्या निषेध मोर्चाने अवघे चिपळूण दणाणले. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर गुरुवारी काढलेल्या निषेध मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
केंद्र सरकारला महागाई आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. या विरोधात चिपळूण काँग्रेसने निषेध मोर्चाचे आयोजन गुरुवारी केले होते. रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय भोसले, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, शहराध्यक्ष लियाकत शाह, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे उपस्थित होते.
निषेधाची जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा भाजी मंडईमधून निघाला. बाजारपेठमार्ग येथून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते पंचायत समिती येथून प्रांत कार्यालय या ठिकाणी आला. या निषेध मोर्चाने साऱ्या चिपळूणकरांचे लक्ष वेधून घेतले.
काँग्रेसच्या मोर्चात सर्वत्र झेंडे दिसत होते, तर मोर्चेकरांच्या हातात निषेधाचे फलक दिसत होते. काँग्रेसने गुरुवारी दणदणीत मोर्चा काढून केंद्र सरकरचा निषेध केला. शहराध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, सेवादल महिला जिल्हाध्यक्ष नीलम शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार थरवल, नगरसेवक कबीर कादरी, करामत मिठागरी, नगरसेवक सफा गोठे, संजीवनी शिंदे, आदींसह उपस्थित होते.
चाैकट
बैलगाड्या ठरल्या आकर्षण
माेर्चात आठ बैलगाड्या आणण्यात आल्या होत्या. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर याचा निषेध म्हणून या बैलगाडी आणून अनोखा निषेध करण्यात आला, तर हातगाडीवर चूल पेटविण्यात आली होती. गॅस दरवाढ प्रचंड झाली आहे. त्यामुळे आता चुलीवरच सारे अवलंबून असल्याने या मोर्चात डोक्यावर मोळी घेतलेले ग्रामस्थ सहभागी झाले होते. बैलगाडी, हातगाडी असे अनोखे चित्र या मोर्चात दिसत होते.