चिपळूण-भूसंपादन चार महिन्यात होणार
By admin | Published: August 24, 2014 10:15 PM2014-08-24T22:15:33+5:302014-08-24T22:36:41+5:30
अनंत गीते : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला गती
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी विविध आंदोलनेही छेडण्यात आली. मात्र, आघाडी सरकारला रस्त्याचे रुंदीकरण लवकर करावे, असे वाटत नव्हते. मात्र, आता इंदापूर ते झाराप अशा ३८० किलोमीटर रस्त्यासाठी केंद्र शासनाकडून ३ हजार कोटी रुपये खर्च करुन रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आज (रविवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.
वांद्रीनजीकच्या सप्तलिंगी (ता. संगमेश्वर) येथील पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ते आले होते. त्यानंतर चिपळूण येथे आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, ज्येष्ठ नेते श्रीराम खरे, राजू भागवत, सचिन खरे, नगरसेविका सुरेखा खेराडे, राकेश शिंदे आदींसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत असल्याने देशाच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना आहे. आघाडी सरकारने रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न हाती घेतला होता. पनवेल ते इंदापूर असा रस्ता करण्यात येणार होता. मात्र, ५ टप्प्यातही या रस्त्याचे काम झाले नाही. गेली तीन वर्षे रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न आपण लावून धरला होता. एका समितीच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावाही सुरु होता. मात्र, राज्य सरकारने यामध्ये असमर्थता दर्शविली, अशी खंत खासदार गीते यांनी व्यक्त केली.
आता शिवसेना - भाजप महायुतीचे सरकार केंद्रात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून केंद्र सरकारने या रस्त्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च करण्याची सहमती दर्शविली आहे. १० टप्प्यात या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून घेतली जाणार असून, त्यांना योग्य तो मोबदला देण्याची सूचना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.(वार्ताहर)
जैतापूर येथे होणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पामुळे दहशतवादाचा धोका अधिक संभवतो. मानवनिर्मित भूकंप झाला, तर दुष्परिणाम होतील. या प्रकल्पामध्ये सुरक्षितता नसल्याने या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याचे केंद्रीय मंत्री, खासदार अनंत गीते यांनी सांगितले.