चिपळूण बाजारपेठेत बेगमीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:35+5:302021-05-19T04:32:35+5:30
चिपळूण : तौक्ते चक्रीवादळानंतरही पावसाचे वातावरण कायम असल्याने शहरवासीयांसह ग्रामीण भागातील लोकांचीही बेगमी खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी ...
चिपळूण : तौक्ते चक्रीवादळानंतरही पावसाचे वातावरण कायम असल्याने शहरवासीयांसह ग्रामीण भागातील लोकांचीही बेगमी खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी मंगळवारी येथील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. तसेच शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद केले असल्याने अंतर्गत भागातील रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू घरपोच सेवा पध्दतीने विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दुकाने उघडल्यास कारवाई केली जात आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनीही त्याला सहकार्य केले आहे. गेले महिनाभर येथील बाजारपेठ बंद आहे. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत गर्दी झाल्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. तरीही काही दुकानदारांकडून शटर बंद ठेवून आतमध्ये ग्राहकांना दुकानाच्या मागील बाजूने घेतले जाते. त्यामुळे शटरआड सुरू असलेल्या या व्यापाराचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी आठ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करत कारवाई केली होती. त्यानंतरही हे प्रकार सुरूच आहेत.
काही दिवसात पाऊस सुरू होईल व पेरणीची कामेही सुरू होतील. त्यामुळे आता बाजारपेठेत बेगमी खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील अनेक जण एकाच गाडीने बाजारपेठेत येऊन एकत्रितपणे खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे मंगळवारी येथील बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी बाजारपेठेत फेरी मारल्यानंतर ही गर्दी नियंत्रणात आली. मात्र त्यानंतर शहरातील खेंड, वडनाका व गुहागर बायपास रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती.
------------------
चिपळूण शहरातील खेड रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती.