चिपळूण बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:58+5:302021-06-03T04:22:58+5:30
चिपळूण : जिल्ह्यात गुरुवारपासून कडक निर्बंध लावले जाणार असल्याचे कळताच शहरातील बाजारपेठ मंगळवारी ग्राहकांच्या गर्दीने पुन्हा ओसंडून वाहू लागली. ...
चिपळूण : जिल्ह्यात गुरुवारपासून कडक निर्बंध लावले जाणार असल्याचे कळताच शहरातील बाजारपेठ मंगळवारी ग्राहकांच्या गर्दीने पुन्हा ओसंडून वाहू लागली. किरकोळ साहित्यांपासून घरातील ‘अत्यावश्यक सामान’ खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेकडे धाव घेतली. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांसह उपनगरांतील दुकानांमध्येही गर्दी झाली. लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला झालेल्या गर्दीने प्रशासनही हादरले.
शहरात गुरुवारपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी २ जूनपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. नागरिकांना खरेदीसाठी वेळ मिळावा म्हणून लॉकडाऊन एक दिवस पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. कडक लॉकडाऊनमध्ये केवळ रुग्णालय आणि औषधालये सुरू राहणार आहेत. दूधही घरपोच मागवावे लागणार आहे. प्रशासनाने लॉकडाऊनकाळात काय सुरू आणि काय बंद याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे खरेदीसाठी लोक घराबाहेर पडले. सर्वाधिक गर्दी शहरातील किराणा दुकानांवर झाली होती. मुख्य बाजारपेठेतही रस्ते गर्दीने खच्चून भरले होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी अंतरनियमांचा फज्जा उडालेला दिसत होता.
भाजी, दूध, एमटीएम, बँकेतही नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. स्थानिक आणि बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
लॉकडाऊनला सहकार्य
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर येथील व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, मुख्याधिकारी वैभव विधाते, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लॉकडाऊनला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे चिपळूण व्यापारी महासंघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.