चिपळूण बाजारपेठ साफसफाईसाठी ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:32 AM2021-07-31T04:32:58+5:302021-07-31T04:32:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर काही दिवसांतच येथील काही व्यापाऱ्यांनी भिजलेल्या कपड्यांसह अन्य साहित्याचे सेल सुरू केले. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर काही दिवसांतच येथील काही व्यापाऱ्यांनी भिजलेल्या कपड्यांसह अन्य साहित्याचे सेल सुरू केले. खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने बाजारपेठेत मदत कार्यासाठी आलेल्या यंत्रणेला अडथळा होऊ लागला. या पार्श्वभूमीवर येथील व्यापारी महासंघाने शुक्रवारपासून बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील सर्व मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून सील करण्यात आला आहे.
महापुरात येथील व्यापारी व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकानातील सर्व खराब माल रस्त्यावर टाकला जात आहे. त्याशिवाय नागरिकांच्या घरातील साहित्यही रस्त्यावर ठेवले जात आहे. त्यामुळे बाजारपेठ व अंतर्गत भागातील रस्त्यावरही जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी हजारो हात अहोरात्र राबत आहेत. त्यासाठी नगर परिषद सफाई कामगारांसोबत काडसिद्धेशवर संप्रदाय, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे शेकडो सदस्य सफाईच्या कामात गुंतले आहेत. याशिवाय मुंबई व ठाणे महानगरपालिका, रत्नागिरी नगर परिषद व लोटे येथील गोशाळेची यंत्रणा काम करीत आहे. कचरा उचलण्यासाठी अनेक गाड्या, डंपर व जेसीबीही दाखल झाले आहेत. मात्र या कामात गर्दीमुळे अडचणी येत होत्या.
याविषयी ओरड सुरू झाल्याने येथील व्यापारी महासंघाने त्याची गांभीरपणे दखल घेत तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महासंघाच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली आहेत. तसेच बाजारपेठ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, सर्व रस्त्यावर बॅरिकेट्स उभारून बाजारपेठ सील केली आहे. तरीही बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी ग्राहकांची गर्दी झाली होती.