'आपत्ती व्यवस्थापन'साठी चिपळूणचे 'जलतरणपटू' सरसावले!, पात्रता निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 04:27 PM2022-05-07T16:27:19+5:302022-05-07T16:28:50+5:30

चिपळूण : पावसाळ्यात २२ जुलै २०२१ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला कसे तोंड द्यावे, याबाबत ...

Chiplun Municipal Council has already started preparations for Disaster Management | 'आपत्ती व्यवस्थापन'साठी चिपळूणचे 'जलतरणपटू' सरसावले!, पात्रता निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

'आपत्ती व्यवस्थापन'साठी चिपळूणचे 'जलतरणपटू' सरसावले!, पात्रता निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

चिपळूण : पावसाळ्यात २२ जुलै २०२१ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला कसे तोंड द्यावे, याबाबत येथील नगर परिषद प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या आपत्तीविरोधात लढण्यासाठी मदत कार्यासाठी धावणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांची पात्रता निवड चाचणी आज, शनिवारी झाली. यामध्ये ३७ जलतरणपटूंनी ही चाचणी शहरातील गांधारेश्‍वर मंदिराच्या डोहात पूर्ण केल्याने त्यांची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली आहे.

गतवर्षी २२ जुलैच्या महापुराने चिपळूण शहरात एकच हाहाकार उडाला होता. बचाव कार्य वेळेत न झाल्याने मोठी मनुष्य व वित्तहानी झाली. त्यानंतर येथील प्रशासनासह नगर पालिका व्यवस्थापन नागरिकांच्या टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, वेळीच मदत कार्य कसे पोहोचविता येईल व होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच अलर्ट झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने पावसाळी पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे येथील अस्तीत्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे.

या संस्थेमार्फत आपत्कालीन बचाव कार्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण १३ ते १५ मे दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, व्यापारी, राजकीय पक्ष यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणापूर्वी त्यात सहभाग घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींची पात्रता निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी वाशीष्टी नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणाऱ्या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड केली. पुणे येथील अस्तीत्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भूषण देशपांडे यांनी संबंधित तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार, वैभव निवाते, राजू खातू, महेश शिंदे, बाळकृष्ण पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात काय शिकायला मिळणार

या शिबिरात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींमधून पोहोता येणारे व पोहोता न येणारे असे दोन गट तयार केले जाणार आहेत. तसेच या शिबिरात पूर आपत्तीला कसं तोंड द्यावे, त्याची तयारी कशी करावी, स्वत:चा जीव व दुसऱ्याचा जीव कसा वाचवावा, लाईफ सेव्हिंग इक्वीपमेंटचा वापर कसा करावा, वित्तहानी कशी टाळावी आदींबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: Chiplun Municipal Council has already started preparations for Disaster Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.