चिपळूण नगर परिषदेने केली एका दिवसात १० लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:51+5:302021-03-17T04:32:51+5:30
चिपळूण : नगर परिषदेने पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून, मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ताही सील करण्यास सुरुवात ...
चिपळूण : नगर परिषदेने पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून, मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ताही सील करण्यास सुरुवात केली आहे. शहरात १० नळ कनेक्शन तोडण्यात आले असून, ३ मालमत्तादेखील सील करण्यात आल्या आहेत. मंगळवारी एका दिवसात सुमारे १० लाख रुपये इतकी वसुली केली.
कोरोनाकाळात थंडावलेली करवसुली चिपळूण नगर परिषदेने पुन्हा एकदा जोरदारपणे सुरू केली आहे. मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वसुली पथक तयार करण्यात आले आहे. गेले काही दिवस करवसुलीबाबत जनजागृती केल्यानंतर आता या पथकाने कारवाई सुरू केली आहे. चिपळूण नगर परिषदेच्या घरपट्टी स्वरूपात ७ कोटी रुपयांची मागणी असून, अद्यापपर्यंत ४ कोटी ८० लाख इतकी वसुली झाली आहे. तर पाणीपट्टी १ कोटी ५० लाख असून त्यापैकी अद्यापपर्यंत फक्त ८० लाख रुपये इतकी वसुली झाली आहे. त्यामुळे करवसुली मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करवसुली पथकाने आता कारवाई करण्यास सुरुवात केली असून शहरात तब्बल १० नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. तसेच मोठे थकबाकीदार असलेल्या ३ मालमत्ताही सील करण्यात आल्या आहेत. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाणीपट्टी तसेच घरपट्टी वेळेवर भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. विधाते यांनी केले आहे. तसेच कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधाही सुरू असून, सुट्टीच्या दिवशीदेखील कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.