चिपळूण नगर परिषदेचे कोविड केअर सेंटर १८ जूनपूर्वी हाेणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:14+5:302021-06-06T04:24:14+5:30
चिपळूण : नगर परिषदेच्या सहकार्याने कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात अपरांत हॉस्पिटलतर्फे उभारण्यात येत असलेले अद्ययावत ५५ बेडचे कोविड ...
चिपळूण : नगर परिषदेच्या सहकार्याने कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात अपरांत हॉस्पिटलतर्फे उभारण्यात येत असलेले अद्ययावत ५५ बेडचे कोविड केअर सेंटर १८ जूनपूर्वी चिपळूणवासीयांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती नगर परिषदेचे आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी यांनी दिली.
उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी शनिवारी या कोविड केअर सेंटरची पाहणी करत अपरांत हॉस्पिटलचे डॉ. यतीन जाधव यांच्याकडून या सेंटर संदर्भातील माहिती जाणून घेतली आणि काही सूचना केल्या. या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही डॉ. जाधव यांनी यावेळी दिली.
शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन चिपळूण नगर परिषदेतर्फे कोविड केअर सेंटर उभारले जावे, असा विषय पुढे आला. या विषयाला सर्वच नगरसेवकांनी नगर परिषद सभेत मंजुरी दिली. यानुसार गेल्या काही दिवसांपासून कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात कोविड केअर सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. हे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, सभापती बिलाल पालकर, नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेविका सई चव्हाण, रसिका देवळेकर, माजी नगरसेवक महमद फकीर, बाबू सुर्वे, राजेश दांडेकर, आदींनी झालेल्या कामाची शनिवारी पाहणी केली. यावेळी अपरांत हॉस्पिटलचे डॉ. यतीन जाधव यांनी या कोविड केअर सेंटरचे १५ जून रोजी काम पूर्ण होईल, तर १८ जूनपूर्वी हे सेंटर चिपळूणवासीयांच्या सेवेत रुजू होईल, अशी माहिती दिली.
-----------------
चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात अपरांत हॉस्पिटलतर्फे उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत कोविड केअर सेंटरची नगरसेवकांनी पाहणी केली.