चिपळूण पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची लेखणी बंद
By admin | Published: May 4, 2016 10:08 PM2016-05-04T22:08:19+5:302016-05-04T23:54:36+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : काही नगरसेवकांच्या त्रासाबाबत कर्मचाऱ्यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेत मंगळवारी झालेल्या कौन्सिल सभेच्यावेळी काही नगरसेवकांनी गोंधळ घालून कर्मचाऱ्यांच्या हातातील इतिवृत्त व अजेंडा हिसकावून घेऊन सभेत अडथळा आणला. याबाबत नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज बुधवारीपासून लेखणी बंद आंदोलन सुरु केले. नगर परिषद कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
नगर परिषदेची विशेष सभा मंगळवारी सायंकाळी झाली. सभेच्या प्रारंभीच नगरसेवक मोहन मिरगल यांनी अजेंडावरील विषय नसताना अवांतर विषयावर चर्चा करण्यास सुरुवात केली. नगरसेवक राजेश देवळेकर यांनी आम्ही मागणी केलेल्या विषयावर चर्चा न करता विशेष सभा का बोलविण्यात आली असे विचारतरच गोंधळास सुरुवात झाली. त्यांनी त्यांच्या हातातील कागदपत्रे सभागृहात भिरकावली. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक इनायत मुकादम यांनी नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्यासमोरील मोकळ्या जागेत उभे राहून तावातावाने बोलण्यास सुरुवात केली. इतिवृत्त लिहिणारे कर्मचारी श्रीनिवास जोशी यांच्या टेबलावरील रजिस्टर हिसकावले. त्यांना जोशी व इतर शिपाई यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी ते बोलतच होते. त्यानंतर शिवसेना गटनेते राजेश देवळेकर यांनी समिती लिपीक विलास चव्हाण यांच्या हातातील अजेंडा हिसकावून घेत सभेच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. नगर परिषदेच्या इतिहासात अशा प्रकारचा घृणास्पद व भीतीदायक प्रकार कधीच घडलेला नाही. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी काही अघटित घडू नये म्हणून कर्मचारी यांनी भीतीपोटी सभागृह सोडले. नगराध्यक्षा होमकळस यांनी सभा तहकूब केली. नगरसेवक सुचय रेडीज व गटनेते राजेश कदम यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून सभेला उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्याधिकारी व काही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सभा पुन्हा सुरु झाली व पुन्हा तोच प्रकार सुरु झाला. मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावरील पुस्तके आपटून विरोधी नगरसेवकांनी त्यांना घेराओ घातला. त्यामुळे मुख्याधिकारी सभागृह सोडून बाहेर आले.
सभागृहातील काही नगरसेवकांचे हे वर्तन पाहता कर्मचारी व अधिकारी यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशाच घटना घडत राहिल्या तर कर्मचारी व नगरसेवक यांच्यामध्ये मोठा वाद उद्भवू शकतो. तरी यापुढे सभेचे कामकाज सभा शास्त्राप्रमाणे होणे आवश्यक आहे. सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरा, विथ साऊंड बसविणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक सभेला पोलीस संरक्षण असणे आवश्यक आहे. सर्व सभांचे चित्रीकरण व्हावे. सभाशास्त्राप्रमाणे सदस्यांना विचारलेल्या प्रश्नान पिटासन अधिकारी व विषय समित्यांचे सभापती यांनी उत्तर देणे आवश्यक आहे. याप्रमाणे कार्यवाही झाली तरच कर्मचारी व अधिकारी हजर राहतील. मंगळवारी झालेल्या घटनेचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, आज कार्यालयात लेखणी बंद आंदोलन केले. यापुढे असे प्रकार सुरु राहिले तर कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह संपावर जातील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. आज सकाळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत हळदे, मंगेश पेढांबकर, सचिन शिंदे, अशोक साठे, दिलीप खापरे, श्रीनिवास जोशी आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा सावित्री होमकळस व उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांना निवेदन दिले. हजारे यांनी हे निवेदन आपण जिल्हाधिकाऱ्यांना पाठवू, असे सांगितले. (प्रतिनिधी)
चिपळूण नगर परिषदेत कर्मचारी संघटनेने आज लेखणी बंद आंदालन केले. यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदार वृषाली पाटील उपस्थित होत्या.