चिपळूण नागरी पतसंस्थेने दिले शेतीपूरक व्यवसायांना बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:31 AM2021-04-07T04:31:42+5:302021-04-07T04:31:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ २७ वर्षांच्या वाटचालीत सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ २७ वर्षांच्या वाटचालीत सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. मार्च २०२१ अखेर संस्थेला व्यावसायिक नफा ३५ कोटी झाला असून, संस्थेने १४७२ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेने पुढील ५ वर्षांत किमान ५००० शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्ध व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम कार्यान्वित केला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली.
या संस्थेची मार्च २०२१ अखेर सभासद संख्या १ लाख २४ हजार ९७३ इतकी आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय १४७२ कोटींचा असून तो २०२५ पर्यंत २५०० कोटींचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण राहूनही संस्थेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा क्षमतेचे सातत्य राखले आहे.
कोविडच्या काळात सुध्दा संस्थेने कामकाज अखंडपणे सुरू ठेवत ग्राहकांना नियोजनबध्द, नम्र व जलद सेवा दिली आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाप्रमाणे नियोजनबध्द प्रयत्न या संस्थेने सुरुवातीपासूनच केले. संस्था आपल्या आर्थिक सक्षमतेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यात यशस्वी झाली आहे. संस्थेने वेगवेगळ्या स्वयंरोजगाराच्या माध्यतातून पुढील ५ वर्षांत २५००० बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी काम सुरू केले आहे. ‘आपली माणसे आपली संस्था’ हे ब्रीदवाक्य खऱ्याअर्थाने सिध्द करण्यात सर्वांचा वाटा असल्याचे सुभाष चव्हाण यांनी सांगितले.