पूरग्रस्तांना चिपळूण नागरी पतसंस्थेचा मदतीचा हात : सुभाष चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:28 AM2021-08-01T04:28:46+5:302021-08-01T04:28:46+5:30
चिपळूण : चिपळुणात महापुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पूरग्रस्तांना प्रचलित व्याजदरापेक्षा कमी व्याजदरात कर्ज पुरवठा ...
चिपळूण : चिपळुणात महापुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पूरग्रस्तांना प्रचलित व्याजदरापेक्षा कमी व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली.
चिपळूण शहर परिसरातील सर्व भाग मोठ्या प्रमाणावर पूर क्षेत्राखाली आला आहे. या सर्वांना मदतीचा हात देण्यासाठी चिपळूण नागरी पतसंस्थेने आपल्या ‘आपली माणसे, आपली संस्था’ या ब्रीदवाक्याला साजेशी अशी सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ठेवून एक वेगळा ठसा समाजामध्ये निर्माण केला आहे. नैसर्गिक संकटात चिपळूण शहरातील तसेच जिल्ह्यातील बाधित झालेल्या संस्थेच्या सभासदांना संस्थेतर्फे अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या पगाराची रक्कम बाजूला काढून संस्थेच्या माध्यमातून तिचे वाटप करण्यात येणार आहे. या आधीही संस्थेने मुख्यंमत्री सहाय्यता निधीसाठी कोरोना काळात १ कोटींची मदत तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी ४ लाखांची भरघोस रक्कम दिली आहे. संस्थेने वेळोवेळी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम केले आहे, अशी माहिती अध्यक्ष चव्हाण यांनी दिली. सर्व पूरग्रस्त सभासदांनी या सर्व योजनांच्या माहितीसाठी आपल्या नजीकच्या शाखेमध्ये किंवा संस्थेच्या प्रधान कार्यालयाकडे संपर्क करावा, असे आवाहनही केले आहे.