चिपळूण नगरपरिषद कर्मचारी संपावर

By admin | Published: July 15, 2014 11:36 PM2014-07-15T23:36:48+5:302014-07-15T23:44:40+5:30

कर्मचारी संघटना आक्रमक

Chiplun Nagarparishad employee strike | चिपळूण नगरपरिषद कर्मचारी संपावर

चिपळूण नगरपरिषद कर्मचारी संपावर

Next

चिपळूण : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेने आज (मंगळवार) राज्यात सर्वत्र पुकारलेल्या संपामध्ये चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दि. १ जुलै रोजी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना नगरपरिषद कामगार संघटनेतर्फे विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले होते. राज्य शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून, या मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. या संपामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेतील कर्मचारीही सहभागी होणार होते. ऐनवेळी त्यांनी या संपातून माघार घेतली असून, चिपळूणसह खेड नगर परिषद कर्मचारी संघटना संपात सहभागी झाली आहे.
दरम्यान, सकाळी ११ वाजता माजी आमदार रमेश कदम यांनी नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनंत हळदे, आरोग्य निरीक्षक अशोक साठे, नगरसेवक राजेश कदम, बांधकाम सभापती बरकत वांगडे, राजू खातू आदींसह अन्य विविध विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. माजी आमदार कदम यांनी संघटनेची भूमिका प्रथम ऐकून घेतली. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आपण योग्य तो विचार करावा, अशी सूचना केली. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत येत्या दोन दिवसांत मंत्रालय स्तरावर विविध संघटनांची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांसमवेत बैठकीस बसण्यास येथील संघटनेने संमती दर्शविली असून, राज्यस्तरीय पातळीवर हा संप असल्याने अन्य संघटनांना विश्वासात घेऊन याबाबत पुढील भूमिका ठरविली जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनंत हळदे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे १०० टक्के वेतन देण्यात यावे, हंगामी, ठेकेदारी, रोजंदारी व मानधनावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे, अनुकंपावरील कर्मचाऱ्यांना त्वरित नियुक्ती द्यावी, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे बांधून मिळावीत, सुट्यांचा मोबदलाही मिळावा, मुख्याधिकारी पदावर कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी आदी विविध १९ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Chiplun Nagarparishad employee strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.