Chiplun Rain Update : चिपळूणमध्ये पावसाचा जोर कमी, मदत कार्याला गती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 09:01 AM2021-07-23T09:01:54+5:302021-07-23T09:05:15+5:30
गुरूवारी चिपळूणमध्ये मुसळधार पावसानं माजवला होता हाहाकार. रात्रीच एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांकडून सुरू करण्यात आलं होतं मदतकार्य.
रत्नागिरी - पावसाचा जोर कमी झाल्यामुळे चिपळूणमधील पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. रत्नागिरीतून दोन हेलिकॉप्टर्स मदतीसाठी रवाना झाली आहेत. गुरुवारी चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता.
एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांनी रात्रीच मदत कार्य सुरू केले होते. मात्र उजेड कमी असल्याने मदत करता येत नव्हती. आता सकाळपासून हे काम अधिक जोमाने सुरू झाले आहे. अजूनही असंख्य लोक पाण्यात अडकून आहेत. कोणी दुकानात अडकले आहेत, कोणी घरात तर कोणी रुग्णालयात अडकून पडले आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
दरम्यान, भारतीय नौदलाची पाच पथके चिपळूणात दाखल झाली आहेत. स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार ही पथके बचावकार्यात सहभागी होतील. गुरूवारी मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं होतं. त्यानंतर अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील चिपळूणची स्थिती सर्वाधिक बिकट झाली होती. चिपळूणमधील बाजारपेठा आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो लोकांचा जीव टांगणीला लागला होता. याठिकाणी शेकडो घरांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतीला खूप मोठा फटका बसला आहे. तसंच नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.