चिपळुणात एसटी बसला अपघात, दैव बलवत्तर म्हणून सर्व बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 07:13 PM2020-01-03T19:13:04+5:302020-01-03T19:14:15+5:30
पंधरागाव मार्गावरील भेलसई येथे अवघड वळणावर शिल्डी-चिपळूण बस रस्त्याबाहेर घसरून अपघात झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली. सुदैवाने या एसटीतील सुमारे ३० प्रवासी बालंबाल बचावले.
चिपळूण : पंधरागाव मार्गावरील भेलसई येथे अवघड वळणावर शिल्डी-चिपळूण बस रस्त्याबाहेर घसरून अपघात झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली. सुदैवाने या एसटीतील सुमारे ३० प्रवासी बालंबाल बचावले.
येथील आगारातून चिपळूण-शिल्डी ही बस पहाटे पाच वाजता सोडण्यात आली. त्यानंरत शिल्डी येथे प्रवाशांना सोडून ही बस चिपळूणकडे येत असताना भेलसई येथे एका अवघड वळणावर हा अपघात घडला.
सकाळच्या धुक्यातून काही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने बसवर नियंत्रण आणताना बसच्या पुढील चाक रस्त्याबाहेर गेले आणि नजीकच्या एका वृक्षाला बस जाऊन टेकली. या वृक्षाच्या पलिकडे दरीचा भाग होता व तेथेच नदीही होती. त्यामुळे वृक्ष नसता तर ही बस थेट नदीत कोसळली असती.
या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी मॅकेनिक व अन्य सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना मदत केली. तसेच घसरलेली बसही क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.
जखमी कोणी नाही- राजेशिर्के
या घटनेबाबत आगार व्यवस्थापक राजेशिर्के यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच बसही सुखरूपने बाहेर काढण्यात आली असून फारसे नुकसान झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.