तिहेरी संकटामुळे चिपळूणला महाप्रलयाचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:20+5:302021-07-25T04:26:20+5:30
यावर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाने काहीशी निराशा केली. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने म्हणावी तशी हजेरी न लावल्याने प्रतीक्षा करावी लागली. मात्र, ...
यावर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाने काहीशी निराशा केली. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने म्हणावी तशी हजेरी न लावल्याने प्रतीक्षा करावी लागली. मात्र, १५ जुलैपासून पावसाने हजेरी लावली तीच जोरदार. जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले. बळीराजाची रखडलेली शेतीची कामे आता मार्गी लागणार म्हणून तो खुश झाला. काही दिवसच झाले. हवामान खात्याने २० ते २२ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची अतिवृष्टी काही ठिकाणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आणि यावेळी तो अचूक ठरला. बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, रात्री अचानक जोर वाढला. कमी वेळात पावसाचे तांडव जणू सुरू झाले. चिपळूणला याचा तडाखा अधिक बसला. जणूकाही ढगफुटीसारखा पाऊस पडू लागल्याने चिपळूण आणि परिसरात पाणी भरू लागले.
समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. मात्र, बुुधवारी रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला. गुरूवारी परिस्थिती भीषण झाली. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी, खेडमध्ये जगबुडी नदी, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरची खाडी, काजळी नदी यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र, भरतीमुळे पावसाचे पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी पूर आला. त्यातच कोळकेवाडी धरण पूर्णपणे वाहू लागले. भेगा पडू लागल्याने फुटण्याचा धोकाही होता. त्यामुळे त्यातून विसर्ग करणे गरजेचे होते. त्यामुळे तो विसर्गही वाशिष्ठी नदीत सुरू झाला. त्यामुळे तर वाशिष्ठी नदीचे रूपही भयावह झाले.
यावर्षीच्या पावसाने २००५चा उच्चांक मागे टाकला. कोयना येथे ६१० मिलिमीटर, नवजा येथे ७४६, महाबळेश्वर ५३५ आणि चिपळूण परिसरात ६०० मिलिमीटर पाऊस झाला. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे पाऊस पडला की, हे पाणी चिपळूणमध्ये जाते. त्यामुळे गुरूवारी चिपळूणमध्ये महाभयंकर स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना महापूर आले आणि सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.
बुधवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने धुमाकूळ घातला, भरतीचे पाणी आणि कोळकेवाडी धरण भरल्याने करावा लागणारा विसर्ग यामुळे चिपळूणला या तिहेरी संकटाचा सामना झेलत महापुराला सामोरे जावे लागले. त्यातच वाशिष्ठी नदीच्या नवीन पुलावर सुरू असलेल्या पिलरच्या बांधकामामुळे पाण्याला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पहिल्यांदाच मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. चिपळूण शहर आणि परिसराला या तिहेरी कारणामुळे महाप्रलयाचा सामना करावा लागला.