चिपळूणला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:41+5:302021-07-22T04:20:41+5:30
चिपळूण : चिपळूणात दिवसभर जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीची पातळी ३.४८ मीटरवर पोहोचली आहे. शिवनदीही ...
चिपळूण : चिपळूणात दिवसभर जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीची पातळी ३.४८ मीटरवर पोहोचली आहे. शिवनदीही दुथडी भरून वाहत आहे. येथे मागील २४ तासात ९७.५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसात बाजारपूल येथील एका चिकन सेंटरवर जुनाट वृक्ष कोसळून नुकसान झाले आहे.
आतापर्यंत तालुक्यात १८९३.४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ११२१ मिलीमीटर पाऊस झाला होता. यावर्षी मात्र पावसाने वार्षिक सरासरीच्या सुमारे ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. सुदैवाने यावर्षी शहरात एकदाही पूर आलेला नाही. वाशिष्ठी व शिवनदीचे पाणी नदीपात्रालगतच्या सखल भागात साचले होते. सद्यस्थितीत शहराला पुराचा तडाखा बसलेला नाही.
बुधवारी सकाळी शहरातील गोवळकोट रोड येथे एका चिकन सेंटरवर वडाचे झाड कोसळले. यामध्ये चिकन सेंटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही काळ गोवळकोट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच या भागातील वीज पुरवठाही खंडित होता. वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
210721\img-20210721-wa0010.jpg
चिपळूणला पावसाने झोडपले