चिपळूणला पावसाने झोडपले; वाशिष्ठी नदीची पातळी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:22 AM2021-06-17T04:22:20+5:302021-06-17T04:22:20+5:30
चिपळूण : अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या दिवसात पावसाने दिलासा दिला. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार सुरुवात केली. संपूर्ण रात्र पावसाची ...
चिपळूण : अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या दिवसात पावसाने दिलासा दिला. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार सुरुवात केली. संपूर्ण रात्र पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी पुन्हा पावसाने दणक्यात सुरुवात केली आणि चिपळूण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. दिवसभर सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आणि वाशिष्ठी नदीची पातळी वाढल्याने बाजारपेठेतील व्यापारी धास्तावून गेले होते. सायंकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.
हवामान खात्याने ११ जूनपासून अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला होता. दोन दिवस अतिमुसळधार आणि नंतर मुसळधार पडण्याचा अंदाज होता. त्यासाठी रेड अलर्टही देण्यात आला होता. या दिवसात एक-दोनवेळा पावसाच्या मोठ्या सरी वगळता चिपळूणमध्ये वातावरण स्वच्छ होते. मंगळवारी रात्रीपासून मात्र पावसाने जोर धरला. मध्यरात्रीनंतर तर सलग पाऊस कोसळत राहिला. पहाटे त्याचा जोर वाढल्याने पुराची भीती पसरली होती. मात्र, सकाळच्या सत्रात काहीकाळ पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे बाजारपेठही सुरळीत सुरू झाली.
सकाळी ११ वाजता पावसाने जोरदार सुरुवात केली आणि बाजारपेठेतील गर्दी आपोआप ओसरली. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. काळाकुट्ट अंधार करत पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. असाच पाऊस राहिला तर दोन तासात पूर येईल, अशीही शक्यता होती. मात्र, सायंकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे वाशिष्ठी नदीची पातळी वाढली असली तरी पुराचा धोका टळला आहे.
महामार्गावर चिखलाचे पाणी
मुंबई - गोवा महामार्गाचे रुंदीकरण काम सुरू आहे. गटारे आणि पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या बाजूची माती पावसामुळे सरळ रस्त्यावर येत असून, महामार्गावर अनेक ठिकाणे चिखलाचे पाणी दिसून येत होते. खड्ड्यातही असे पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते.