चिपळूणला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:47+5:302021-05-08T04:32:47+5:30
चिपळूण : विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह चिपळूण शहराला वळवाच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. गुरुवारी सायंकाळी ६ ...
चिपळूण : विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह चिपळूण शहराला वळवाच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पावसाने जोरदार सुरुवात केली आणि सुमारे तासभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे वातावरणात गारवा आला. तालुक्याच्या ग्रामीण भागात गेले काही दिवस पावसाचा शिडकावा सुरु आहे. गुरुवारी कडकडीत ऊन आणि स्वच्छ वातावरण असताना सायंकाळी ५ वाजता अचानक वातावरण बदलले. काळाकुट्ट अंधार करत प्रथम वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूने विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. काही वेळेतच हळुवार पावसाने सुरुवात केली.
सुरुवातीला संथ पडणाऱ्या पावसाने नंतर मात्र चांगलाच जोर पकडला हाेता. सुमारे तासभर पावसाचे धुमशान सुरू होते. काही ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले. मुंबई-गोवा महामार्गचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी माती काढण्यात आली आहे. त्या मातीवर पाऊस पडल्याने हा चिखल रस्त्यावर आला होता.