चिपळूणचे पाणीही आता महाग

By admin | Published: July 20, 2014 10:40 PM2014-07-20T22:40:22+5:302014-07-20T22:46:56+5:30

कठोर उपाय : अर्धा इंच पाणीपट्टीतही ३०० रुपये वाढ

Chiplun water is expensive too | चिपळूणचे पाणीही आता महाग

चिपळूणचे पाणीही आता महाग

Next

उत्तमकुमार जाधव- चिपळूण
दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तुंबरोबर अन्य वस्तूंचे दर वाढत आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला महिन्याचे बजेट भागवताना उसनवार करावी लागत आहे. आता चिपळूण नगरपरिषद प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे चालू वर्षात पाणीपट्टीत वाढ केली जाणार आहे. सर्वसाधारण नळधारकाला पूर्वीपेक्षा ३०० रुपये जास्त नळपट्टी भरावी लागणार आहे.
नगरपरिषद प्रशासनातर्फे शहर परिसराला पाणी पुरवठा केला जातो. वीजनिर्मिती केल्यानंतर कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी खेर्डी येथील पंपहाऊसद्वारे उचलले जाते. हे पाणी परिसरातील उपनगर विभागाला पुरविले जाते. दिवसेंदिवस पाण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यामुळे नळ जोडणीधारकांची संख्याही जास्त आहे. नगरपरिषद प्रशासनातर्फे गेल्या ७ वर्षांपूर्वी सुरु झालेली सुधारित नळपाणी योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे काही भागात कमी दाबानेही पाणीपुरवठा होत आहे.
गोवळकोट येथे पंपहाऊस असून, या परिसरालाही गेल्या काही महिन्यापूर्वी गढूळ व मचूळ पाणी पिण्याची वेळ आली. सध्या पाऊस सुरु झाला असल्याने पाणी समस्या तेवढी जाणवत नाही. मात्र, नगर परिषदेच्या ३० जुलै २०१३ च्या मुख्य सभेमध्ये या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव करण्यात आला. त्या ठरावानुसार आता याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्धा इंची घरगुती पाणीपट्टी १ हजार २००, अर्धा इंची व्यापारी ३ हजार ५८०, पावणाइंची घरगुती ३०००, पावणाइंची व्यापारी ७ हजार ११८ रुपये अशी सुधारित नळपाणी पट्टी असून, पूर्वीचे दर ९००, १ हजार ६५०, २०००, ५००० असे होते. दरामध्ये वाढ करण्यात आली असून, नवीन पाणी दरानुसार पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे.

नगरपरिषद प्रशासनाचा जास्त खर्च हा पाणी पुरवठ्यावर होत आहे. हा खर्च नियंत्रणात आणण्याबाबत दरवर्षी होणाऱ्या अंदाजपत्रकाच्या बैठकीत चर्चा होते. मात्र, हा खर्च दरवर्षी वाढतच आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाला पाणी पुरवठा बंद करणे अशक्य आहे. मात्र, जे नळपट्टीधारक थकीत आहेत. त्यांना नोटीस पाठविण्यात आली असून, दिलेल्या मुदतीत नळपट्टी भरली नाही तर नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाहीही केली जाणार आहे. वाढीव नळपट्टीबाबत अद्यापही सर्वजण मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे.

चिपळूण शहरासाठी अंदाजे १२ कोटीची सुधारित नळपाणी योजना राबविण्यात येणार असून, या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. डिसेंबरअखेर योजना पूर्ण होईल, असे आश्वासन ठेकेदार चंद्रकांत सुवार यांनी दिले होते. पाण्याची वाढणारी मागणी लक्षात घेऊन काही नागरिकांनी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता ही योजना सुरु होण्यास अजूनही काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Chiplun water is expensive too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.