घंटानाद करत चिपळूण बचाव समितीचा हल्लाबाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:33 AM2021-09-26T04:33:41+5:302021-09-26T04:33:41+5:30

चिपळूण : घंटा बजाव....चिपळूण बचाव...पूर संकटाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा...अशा जोरदार घोषणा देत व घंटानाद करत चिपळूण बचाव समितीने ...

Chiplun will attack the rescue committee by ringing the bell | घंटानाद करत चिपळूण बचाव समितीचा हल्लाबाेल

घंटानाद करत चिपळूण बचाव समितीचा हल्लाबाेल

Next

चिपळूण : घंटा बजाव....चिपळूण बचाव...पूर संकटाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा...अशा जोरदार घोषणा देत व घंटानाद करत चिपळूण बचाव समितीने चिपळूण नगर परिषद व पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. चिपळूणला आलेल्या महापुराला कारणीभूत कोण, त्याची कारणे कोणती, भविष्यात असे संकट येणार नाही त्याबाबत काय उपाययोजना आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

चिपळूण शहरातील पूररेषा आणि त्यामुळे शहर विकासावर होणारे अनिष्ट परिणामांमुळे वातावरण ढवळून निघाले. मात्र, चिपळुणात आलेल्या महापुराबाबत अद्याप कोणतीच कारणे पुढे येत नसल्याने चिपळूण येथील व्यापारी व नागरिकांनी भविष्यातील धोका ओळखून चिपळूण बचाव समितीची स्थापन करत थेट संबंधित प्राधिकरणाला जाब विचरण्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येकवर्षी जर अशाच पद्धतीने पुराचे पाणी घुसत राहिले, तर चिपळूण शहरात वास्तव्य करणे कठीण होणार आहे. त्यामुळे आतापासून चिपळूण बचाव ही चळवळ उभी करण्याचा व शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न या समितीकडून केला जाणार आहे.

शिरीष काटकर, किशोर रेडीज, अरुण भोजने, उदय ओतरी, समीर जानवळकर, शहनवाज शहा, राम रेडीज, सतीश कदम, महेंद्र कासेकर, गुलमहमंद शहा असे व्यापारी व नागरिक एकत्र आले. त्यांनी थेट चिपळूण नगर परिषद कार्यालयावर धडक देत घंटानाद केला. येथील मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची भेट घेत पुराची माहिती नगर परिषदेला होती का, माहिती असूनही नागरिकांना सतर्क का केले नाही, कोणत्या धरणामधून पाणी सोडले गेले, त्यावेळी चिपळूणमध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला, यापुढे अशी पूरस्थिती निर्माण झाल्यास नगर परिषदेची तयारी काय, कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत चिपळूण बचाव समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर केले. त्यानंतर समिती पदाधिकाऱ्यांनी थेट पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणीही घंटानाद करण्यात आला.

चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असल्याचा थेट आरोप उपस्थितांनी केला. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न करत यामध्ये दोषी असणाऱ्यांची नावे समोर आणा. त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पाठलाग सोडणार नाही, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला. तसेच भविष्यात अशा पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती उपाययोजना तयार आहे त्याची माहिती द्या, अशी मागणी करून निवेदन सादर केले.

Web Title: Chiplun will attack the rescue committee by ringing the bell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.