चिपळुणात धान्य महोत्सव
By admin | Published: March 23, 2017 03:06 PM2017-03-23T15:06:25+5:302017-03-23T15:06:25+5:30
२५ मार्चपासून प्रारंभ, ८0२ क्विंटल धान्य उपलब्ध
आॅनलाईन लोकमत
चिपळूण : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी वसंत शेतकरी विकास संघ चिपळूणतर्फे जिल्हास्तरीय धान्य महोत्सव व शेतीविषयक चर्चासत्र दि.२५ ते २७ मार्च या कालावधीत अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकूल नगर परिषदेसमोर होणार आहे. या महोत्सवात ८०२ क्विंटल धान्य उपलब्ध असणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी रघुनाथ जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या ठिकाणी महोत्सवात दर्जेदार व निवडक शेती माल उपलब्ध होणार असून नागरिकांनी निवडक व स्वस्त धान्य खरेदीचा लाभ घ्यावा या साठी शनिवार दि. २५ ते २७ मार्च असे तीन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री होणार असून कमीत कमी दरात शेतमाल उपलब्ध होणार आहे. शिवाय फळे, भाजीपाला, सेंद्रिय माल स्वच्छ व निवडक शेतीमाल, सेंद्रिय शेतीतून उत्पादन केलेला माल, ठेवणीसाठी उपयुक्त व दर्जेदार माल, दुर्मिळ व देशी वाण, सेंद्रिय गुळ, काकवी यांचाही समावेश राहणार आहे. शिवाय कलमे, रोपे, फळे, गांडूळ खत यांची विक्री होणार आहे. विविध बचत गटांनी उत्पादित केलेला मालही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.८४ क्विंटल नागली,७२ क्विंटल गहू, ५० क्विंटल शालू ज्वारी, ५२२ क्विंटल तांदुळ, ४१५ क्विंटल हळद, १८ क्विंटल पावटा असे विविध अन्नधान्य व कडधान्याचे प्रकार येथे असणार आहेत. असेही सरतापे यांनी सांगितले.
तीन दिवस डॉ. वैंभव शिंदे, मिलींद पाटील, मिलींद वैद्य, शिरिष तेरखेडकर व फ्रांसिस डिसोझा हे तज्ज्ञ शेती विषयक मार्गदर्शन करणार आहेत. दि.२५ रोजी सकाळी १० वाजता अण्णासाहेब खेडेकर क्रिडा संकुलात आमदार भास्कर जाधव व आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सभापती पूजा निकम, उपस्थित राहणार आहेत.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक एस. एच.जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एच. सरतापे ,कृषि वसंत शेतकरी विकास संघाचे बापू काणे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)