चिपळूणच्या मुलांचा खाऊच्या पैशातून पूरग्रस्त मित्रांसाठी हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:22+5:302021-09-04T04:38:22+5:30
रत्नागिरी : चिपळणू येथे २२ जुलै रोजी आलेल्या पुराने शहर आणि परिसरातील घरे, दुकाने, वाहने यांचे अतोनात नुकसान झाले. ...
रत्नागिरी : चिपळणू येथे २२ जुलै रोजी आलेल्या पुराने शहर आणि परिसरातील घरे, दुकाने, वाहने यांचे अतोनात नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला असतानाच चिपळुणातील मुले आपल्या दोस्तांच्या मदतीसाठी पुढे आली आहेत. या मुलांनी पर्यावरणपूरक गणेशाच्या सुबक मूर्ती बनविल्या असून त्यांच्या विक्रीतून ही मुले पुरात ज्यांचे शैक्षणिक साहित्य भिजले आहे, अशांना नव्याने साहित्याची मदत करणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा- काॅलेज बंद आहेत. त्यामुळे ही मुले घरात बसून कंटाळली आहेत. अशातच चिपळूण येथे पुराने झालेल्या हानीमुळे या मुलांच्या कानावर सतत पुराचेच विषय येत होते. यातूनच चिपळुणातील डाॅ. सुनील कोतकुंडे आणि डाॅ. श्रुतिका काेतकुंडे यांची १३ वर्षीय कन्या सई आणि तिच्याच वयाचे अदिती पवार, शौर्य मोहिते, वैभवी मोहिते आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणारी प्राची जोगळेकर एकत्र आले. मैत्रीच्या भावनेतून त्यांनी मैत्रिणीच्या घरी जाऊन साफसफाईमध्ये मदत केली, पण या मुलांमध्ये अजून काही तरी करण्याची ऊर्मी होती. त्यांना शांत बसवेना. यातूनच त्यांना कल्पना सुचली. या पुरात मुलांचेही शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. घरातले मोठे मदत कार्यात गुंतलेत. आपणही काहीतरी करावे जेणेकरून वेळही जाईल आणि बाधित मुलांना फूल ना फुलाची पाकळी मदत होईल.
या मुलांनी डाॅ. कोतकुंडे दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडील गणपती साचा, शाडूची माती वापरून गणपती बनवले आणि ते रंगवून तयार केले. मखर बनवण्यासह सुरुवात केली. रिकामा वेळ मोबाईलवर घालविण्यापेक्षा काही तरी विधायक पावले उचलत या मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून सामान खरेदी केले आणि त्यातून आता ही मुले मूर्ती बनवीत आहेत. या मूर्तींच्या विक्रीतून जे पैसे येतील, ते पूरग्रस्त मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येणार आहेत. मुलांच्या या सद्भावनेतून सुरू असलेल्या प्रयत्नाला गणेशभक्तांनी साथ द्यावी, असे आवाहन मुलांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.
वाया जाणारे साहित्य स्त्कारणी....
या मुलांनी पार्सल पॅकिंगमध्ये वापरले जाणारे मात्र नंतर त्याचा काही उपयोग नसलेले असे कार्डबोर्ड, कागद आणि सजावटीचे साहित्य आपल्या खाऊच्या पैशातून खरेदी करून आतापर्यंत आकर्षक ६ गणेशमूर्ती केल्या असून ३ मखरही केले आहेत. त्यांच्या विक्रीतून ते गरजू मुलांना मदत करणार आहेत.