चिपळूणच्या संस्थेने रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह, पोलिसांची समयसूचकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 03:40 PM2020-10-28T15:40:40+5:302020-10-28T15:44:22+5:30
crimenews, police, ratnagirinews अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध अमान्य असल्याने तिच्या प्रियकराला सज्ञान होईपर्यंत वाट पाहण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याच कालावधीत मुलीचे दुसऱ्याच मुलाबरोबर परस्पर लग्न ठरविण्याचा पालकांचा प्रयत्न पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने निष्फळ ठरला आहे.
चिपळूण : अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध अमान्य असल्याने तिच्या प्रियकराला सज्ञान होईपर्यंत वाट पाहण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याच कालावधीत मुलीचे दुसऱ्याच मुलाबरोबर परस्पर लग्न ठरविण्याचा पालकांचा प्रयत्न पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने निष्फळ ठरला आहे.
महाड शहर पोलिसांनी पोलादपूर येथील अल्पशिक्षित महिला कार्यकर्तीसह चिपळूण येथील बोधिरत्न सोशल इन्स्टिट्यूट ट्रस्टच्या दीक्षा कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला आणि तिच्या पालकांना योग्य समज देऊन नियोजित बालविवाह टाळण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
महाड तालुक्यातील रायगडकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या गावातील एका अल्पवयीन मुलीचे भिन्न समाजातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे तिच्या आई-वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे तिला परस्पर नातेवाईकांकडे सातारा जिल्ह्यातील भुईंज गावामध्ये नेवून ठेवले आणि हडपसर, पुणे येथे दिनांक २९ ऑक्टोबर रोजी तिचे समाजात परस्पर लग्न करण्याचा घाट घातला.
या मुलीला विवाह मान्य नसल्याने तिने तिच्या प्रियकराशी संपर्क साधून आत्महत्येची धमकी देत तिला तेथून घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर प्रियकराने तिला नातेवाईकांच्या नकळत घेऊन पोलादपूर येथील महिला कार्यकर्ती क्षमता बांद्रे यांच्या घरी आणले. यादरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी भुईंज येथे पोलादपूर ठाण्यात बेपत्ताची नोंद दाखल केली.
त्यानंतर त्या मुलीला महाड पोलीस स्थानकात आणण्यात आले. तिथे चिपळूण येथील बोधिरत्न सोशल इन्स्टिट्यूट ट्रस्टच्या दीक्षा कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्राचे चेअरमन व दापोली येथील प्रा. उदय पवार यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी या प्रकरणी लक्ष देत मुलीच्या आई - वडिलांना पाचारण करून मुलीची समजूत काढून अल्पवयीन मुलीचे लग्न लावणे कायद्याने गुन्हा ठरत असल्याची जाणीव करून देत मुलीचा ताबा आई - वडिलांकडे देण्यात आला.
गुन्हाही टळला
आई-वडिलांकडून स्वत:च्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह टळला. तसेच भिन्न जातीतील तरूणासोबत घाईघाईत विवाह करून अजाणतेपणात तरूणाला पोक्सो तसेच बालविवाहाच्या गुन्ह्यात अडकण्याची शक्यताही टळली आहे. पोलिसांनीही कायदेशीर बडगा न उगारता पालकांना समज दिल्याने पुढील कारवाई टळली.
चार तास समुपदेशन
चार तासांच्या समुपदेशनानंतर मुलीने आई-वडिलांकडे सज्ञान होईपर्यंत राहण्यास अनुकूलता दर्शविली. मुलीला बालसुधारगृहामध्ये दाखल करण्याऐवजी मुलीचा ताबा घेण्याची इच्छा पालकांनी दर्शवली. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून बालविवाह टाळण्यात प्रा. उदय पवार व क्षमता बांद्रे यांनी भूमिका बजावली.