चित्रा वाघ यांनी दिलगिरी व्यक्त न करता माफी मागावी, भंडारी समाजाच्या जाहीर सभेत सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:33 PM2022-12-26T17:33:07+5:302022-12-26T17:33:31+5:30
'रत्नागिरीतील पतित पावन मंदिर हे स्व. भागोजीशेठ कीर यांनीच बांधल्याने त्यांच्याकडून वदवून घेणे हे हेच सभेचे खरे इतिवृत्त असेल'
रत्नागिरी : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त न करता जाहीर माफी मागावी, असा सूर या भंडारी समाज आयोजित निषेध सभेत उमटला. रत्नागिरीतील पतित पावन मंदिर हे स्व. भागोजीशेठ कीर यांनीच बांधल्याने त्यांच्याकडून वदवून घेणे हे हेच सभेचे खरे इतिवृत्त असेल, असे स्पष्ट मत भंडारी समाजाचे नेते व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी व्यक्त केले.
भाजपच्या चित्रा वाघ यांनी पतितपावन मंदिराच्या इतिहासाबाबत चुकीचे माहिती ट्वीट केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी (२५ डिसेंबर) रत्नागिरीत भंडारी समाजातर्फे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते.
कीर पुढे म्हणाले, गेल्या दोन-तीन महिन्यांतील प्रकार पाहता हे ठरवून केले जातेय, हे स्पष्ट होत आहे. कारण संविधानिक पदावरची माणसे बेजबाबदारपणे बोलत आहेत. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने षङ्यंत्र आहे. त्याचाच हा एक भाग आहे, असा गंभीर आरोप कीर यांनी केला.
या सभेचे नियोजन राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले हाेते. यावेळी कॅप्टन दिलीप भाटकर, मुंबईचे पोलिस निरीक्षक नितीन मिरकर, भागोजीशेठ कीर यांच्या नात अरुणा शिरधनकर, कौस्तुक नागवेकर, राजू कीर, राजेंद्र आयरे, डॉ. मकरंद पिलणकर, नीलेश नाचणकर यांनी विचार व्यक्त केले.
- नरिमन पॉइंट येथील ब्रिटिशांच्या काळात बांधलेली तटरक्षक भिंत भागाेजीशेठ कीर यांनी बांधली. या तटरक्षक भिंतीच्या कडेला ३५०० लोकांची मानवी साखळी करण्याचे नियोजन केल्याचे अखिल भारतीय भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी सांगितले.
- २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणाऱ्या भंडारी समाजाच्या रॅलीची सांगता पतितपावन मंदिरात हाेणार आहे तसेच भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिरात सुरू केलेली जेवणावळ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.