चित्रा वाघ यांना ‘ते’ ट्वीट भोवणार?, भंडारी समाज भावना दुखावल्याने एकवटला; रत्नागिरीत उद्या निषेध सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 04:08 PM2022-12-24T16:08:01+5:302022-12-24T16:08:45+5:30
ट्वीटनंतर भंडारी समाजाने नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, याबाबत चित्रा वाघ यांनी माफीही मागितलेली नाही
रत्नागिरी : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रत्नागिरीतील पतितपावन मंदिराबाबत काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर भंडारी समाजाने नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, याबाबत चित्रा वाघ यांनी माफीही मागितलेली नाही. त्यामुळे आता भंडारी समाज भावना दुखावल्याने एकवटला असून, रविवार, २५ डिसेंबर रोजी भैरव मंगल कार्यालय येथे जाहीर निषेध सभेचे आयोजन केले आहे.
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी रत्नागिरीतील पतितपावन मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्याची छायाचित्रे ट्वीट करत ‘स्वा. वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पूजा केली,’ असे म्हटले होते. या ट्वीटनंतर भंडारी समाजाने संताप व्यक्त केला होता.
रत्नागिरीतील पतितपावन मंदिर हे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या सांगण्यानुसार श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी रत्नागिरीच्या वरच्या आळीत २० गुंठे जमीन विकत घेऊन दीड लाख रुपये खर्च करून पतितपावन मंदिर उभे केले. हा मंदिराचा इतिहास आहे. हा इतिहास मंदिराबाहेरही लावण्यात आला आहे. मंदिराचा हा इतिहास असतानाही चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्वीटमुळे भंडारी समाजाने संताप व्यक्त केला होता. तसेच या प्रकाराबाबत चित्रा वाघ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भंडारी समाजाने केली होती. मात्र, त्यांनी याबाबत कोणताही प्रतिसाद न दिल्याने भंडारी समाजाने जाहीर निषेध सभेचे आयोजन केले आहे.
श्रीमान भागोजीशेठ कीर हे भंडारी समाजाचे आराध्य दैवत आहे. त्यांचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचा हा निंदनीय प्रकार झाला. त्याचा निषेध जाहीर सभेत करण्यात येणार आहे. या सभेला भंडारी समाजाने उपस्थित राहावे, असे आवाहन समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, कुमार शेट्ये आणि नीलेश नार्वेकर यांनी केले आहे.