मुलांच्या निरोगी दंतपंक्तींवर चाॅकलेट्सचा होतोय हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:34 AM2021-08-27T04:34:47+5:302021-08-27T04:34:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अति गोड पदार्थ खाणे, तसेच चाॅकलेट्स खाणे वाढल्याने लहान मुलांमध्ये दात खराब होण्याचे प्रमाण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अति गोड पदार्थ खाणे, तसेच चाॅकलेट्स खाणे वाढल्याने लहान मुलांमध्ये दात खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चाॅकलेट्स अति खाणे दातांसाठी हानिकारक ठरत असून लहान मुलांचे दात खराब होऊ लागले आहेत.
सध्या बहुतांशी मुलांना विविध प्रकारच्या चाॅकलेट्सचे आकर्षण वाटत आहे. त्यामुळे मुले जेवण किंवा फळे यांसारखा आहार न घेता चाॅकलेट्स मोठ्या प्रमाणावर खात आहेत. गोड पदार्थ किंवा चाॅकलेट खाल्ल्यानंतर ते दाताला चिकटून राहते. त्यामुळे किमान तीनवेळा चूळ भरायला हवी. मात्र, मुले हे करण्याचा कंटाळा करतात. त्याचबरोबर दिवसातून दोनवेळा योग्य प्रकारे दात घासणे गरजेचे असले तरीही, ही मुले ब्रश करायला विसरतात, तर कधी कंटाळा करतात. त्यामुळे सध्या बहुतांशी मुलांचे दात खराब होऊन लहान वयातच किडत आहेत.
लहान मुलांबरोबरच सध्या शालेय आणि अगदी महाविद्यालयीन विद्यार्थीही चाॅकलेट्सच्या अधीन झालेले दिसतात. त्यामुळे या वयोगटातही चाॅकलेट्स खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहानच नव्हे, तर युवकांमध्येही दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर दातांच्या विषयक अनेक समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे आता चाॅकलेट्स खाणाऱ्यांनी त्याबरोबरच दात निरोगी ठेवण्यासाठीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दातांची निगा योग्यप्रकारे राखली नाही, तर दातांचा कायमस्वरूपी क्षय होतो. यातूनही अनेक समस्या उद्भवतात.
यावर उपाय म्हणून दंतरोग तज्ज्ञांच्यामते, हे टाळण्यासाठी चाॅकलेट खाल्ल्यानंतर ते दाताला चिकटून राहते. त्यामुळे जेवणापूर्वी चाॅकलेट खावे. तसेच दिवसातून दोनवेळा जेवल्यानंतर दात किमान ३ ते ४ मिनिटे घासावेत, त्यामुळे दातांवरील खाद्यपदार्थ किंवा चाॅकलेटचा थर निघून जातो.
चाॅकलेटस् न खाल्लेलेच बरे
- चाॅकलेट खाल्ल्यामुळे त्याचा चिकटपणा दातांवर बसतो.
- लहान मुले चाॅकलेट खाल्ल्यानंतर चूळ भरण्याचा कंटाळा करतात.
n चाॅकलेटच्या कणांमुळे दात किडू लागतात. मुलांचे चाॅकलेट्स खाण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा हानिकारक परिणाम त्यांच्या दातांवर होऊ लागला आहे. त्यामुळे पालकांनी चाॅकलेटपासून त्यांना दूर ठेवणे अधिक चांगले.
लहानपणीच दातांना कीड
गोड पदार्थाचे अधिक सेवन करणे तसेच चाॅकलेट्स खाणे यामुळे दातांच्या समस्या वाढल्या आहेत. लहान मुले अधिक प्रमाणात चाॅकलेट्स खाऊ लागली आहेत. त्याचे कण दातातच अडकून राहतात. त्यामुळे दाताला कीड लागण्याचे प्रकार वाढले आहेत. कीड लागल्यानंतर काही दिवसांनंतर दात दुखू लागतो. डाॅक्टरांकडे गेल्यानंतर दाताला कीड लागल्याचे लक्षात येते. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर चूळ भरण्याची सवय मुलांना लावावी.
अशी घ्या दातांची काळजी...
- गोड पदार्थ जेवणापूर्वी खावेत किंवा इतर पदार्थ खाण्यापूर्वी खावेत
- कुठलाही गोड किंवा अन्य खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर किमान तीन वेळा खळाळून चुळा भराव्यात
- दोन वेळा दात घासले जावेत
खाण्याकडे लक्ष द्यावे
मुलांना चाॅकलेट्सचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण असते. सध्या विविध प्रकारची चाॅकलेट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मुलांना चाॅकलेट्स खाण्यापासून पूर्णपणे दूर ठेवणे आई - वडिलांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलांनी चाॅकलेट्स खाल्ल्यानंतर त्यांना चूळ भरण्याची सवय लावावी. हळूहळू सर्वच पदार्थांसाठी ही सवय लागते. तसेच दोन वेळा ब्रश करण्याची सवयही लावायला हवी.