कोरोना काळात नागरिकांनीही पुढे येणे गरजेचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:41+5:302021-04-28T04:33:41+5:30
गुहागर : तालुक्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींना संबंधित ग्रामपंचायत महसूल कर्मचारी व नगरपंचायत गुहागरच्या कर्मचाऱ्यांमार्फतच दिला जात आहे. शासनाच्या ...
गुहागर : तालुक्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींना संबंधित ग्रामपंचायत महसूल कर्मचारी व नगरपंचायत गुहागरच्या कर्मचाऱ्यांमार्फतच दिला जात आहे. शासनाच्या नियमानुसार शासकीय कर्मचारी म्हणून आपले कर्तव्य बजावत असले तरी मृत रुग्णाच्या नातेवाइकांसह सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अग्नी देताना शासकीय कर्मचाऱ्यांसोबत मृत रुग्णाचे नातेवाईकसुद्धा सोबत येत नाहीत. आठवडाभरात तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरळ, गिमवी, वेळंब, पालशेतबरोबर गुहागर शहरातील एकाचा समावेश आहे. या मयत रुग्णांना नगरपंचायतीमार्फत अग्नी देण्यात आला. मात्र यामध्ये एक वेगळाच अनुभव नगरपंचायत कर्मचाऱ्यांना अनुभववास मिळाला. सर्व मृतांना अग्नी देताना सोबत एक तरी नातेवाईक उपस्थित होता. गिमवी येथील एक वृद्ध सुरुवातीला शृंगारतळी येथील रेम्बो लॉजिंग येथील खासगी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होता. या रुग्णाची तब्बेत गंभीर झाल्यानंतर गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पुढील मृतदेहाला अग्नी देण्याचे कर्तव्य नगरपंचायत गुहागरने पार पाडले. मात्र यावेळी या रुग्णाचा नातेवाईक गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित असूनही एकही व्यक्ती स्मशानभूमीत आली नाही.
तालुक्यात अनेक रुग्ण उपचार घेताना ज्याच्याबरोबर आपण वर्षानुवर्षे राहिलो अशा आईवडील तसेच नातेवाइकांना घाबरून पाहण्यासाठीसुद्धा येत नाहीत अशी विदारक स्थिती पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत, महसूल, पोलीस व नगरपंचायत कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत असताना अद्याप तालुक्यात एकही सामाजिक संस्था, व्यक्ती पुढे आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.