अपुऱ्या लसच्या साठ्यामुळे नागरिकांची केंद्रावर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:31 AM2021-04-27T04:31:49+5:302021-04-27T04:31:49+5:30
रत्नागिरी : सध्या जिल्ह्याला लसींचा पुरवठाच अतिशय कमी होत असल्याने पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढती आहे. येणारे डोस अपुरे ...
रत्नागिरी : सध्या जिल्ह्याला लसींचा पुरवठाच अतिशय कमी होत असल्याने पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढती आहे. येणारे डोस अपुरे असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण झालेले नाही. त्यामुळे साठा आला की, नागरिकांची गर्दी लसीकरण केंद्रावर होते. मात्र, मर्यादित साठा असल्याने नोंदणी करूनही अनेकांना वारंवार परत जावे लागते, ही तीव्र नाराजी रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी व्यक्त केली.
शासनाकडून जिल्ह्यासह राज्यात लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने लस घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. ऑनलाइन नोंदणी करूनही लसींचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे लोकांचा संयम सुटू लागला आहे. शनिवारी लस संपल्याने रविवार आणि सोमवारचे नियोजित लसीकरण रद्द झाल्याचे आरोग्य विभागाकडून शनिवारी रात्री कळविण्यात आले होते. मात्र, रविवारी उशिरा जिल्हा प्रशासनाला १० हजार कोविशिल्डच्या लसींचा पुरवठा झाल्याने रत्नागिरी शहरातील झाडगाव, मिस्त्री हायस्कूल आणि कोकणनगर या तीन केंद्रांवर सोमवारी दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू झाले.
सध्या जिल्ह्यात कोवॅक्सिन लस शिल्लक नसून केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. लस उपलब्ध होताच केंद्रांवर गर्दी होते, सगळ्याच लोकांना लस मिळणे अवघड होत आहे. दोन-तीन दिवस सलग खेटे मारूनही नागरिकांना लस मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरत आहे. काही ज्येष्ठ नागरिकांना अनेक व्याधी असूनही बराच काळ थांबावे लागते. त्यामुळे नागरिक आणि यंत्रणा यांच्यात वाद निर्माण होण्याचे प्रसंग घडत असल्याचे सोमवारी समोर आले. मात्र, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या तिन्ही केंद्रांवर सकाळपासून उपस्थित राहून नागरिकांना आणि आरोग्य यंत्रणेला मदत करीत असल्याने लसीकरण प्रक्रिया सुरळीत होत आहे. रत्नागिरीतील तिन्ही केंद्रांवर सोमवारी हे चित्र होते. साेमवारी लसींचा साठा कमी असल्याने घेणाऱ्यांची गर्दी तिन्ही केंद्रांवर कमी होती.
कोकणनगर केंद्रात अपुऱ्या जागेमुळे सोशल डिस्टन्सिंग तारेवरची कसरत
सोमवारी काेकणनगर अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, केवळ १०० डोसचे तेही दुसऱ्या डोससाठी असल्याने गर्दी कमी होती. मात्र, रजिस्ट्रेशन केलेले परंतु पहिला डोस न मिळालेले दहा-बारा जण उपस्थित होते. काही जण तर अगदी साडेपाच वाजल्यापासून डोस घेण्यासाठी आले होते. त्यामुळे आम्ही ऑनलाइन नाेंदणी केली आहे. तरीही पहिली लस मिळालेली नाही. आम्ही किती खेपा मारायच्या, असा प्रश्न विचारत होते. या केंद्रावरील परिचारिकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर या ठिकाणी असलेल्या विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी या नातेवाईकांची समजूत काढून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. मर्यादित लस आल्याने दोन तासांतच ती संपली. लसीकरण मोहीम पर्यवेक्षिका पल्लवी भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ता भटणे, नोंदणीसाठी आरती पाटील, हर्षा म्हादये, आशा प्रतिभा भाटकर या सांभाळत होत्या.
काेकणनगर येथे नागरिक मास्क लावूनच येत होते. मात्र, या भागातील नागरिकांची संख्या पहाता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना तारेवरची कसरत होत होती. मात्र, स्वयंसेवक या परिसरात गर्दी होणार नाही, याची काळजी घेत होते. या केंद्रांवर हेल्पिंग हॅण्डसचे राजेश नेने, सूर्यकांत कटारिया, साैरभ मुळ्ये, शैलेश बेर्डे, वीरेंद्र सावंत, सचिन केसरकर, नेहा साळवी, सिद्धेश धुळप आदी विविध संस्थांचे कार्यकर्ते तसेच राजरत्नचे सचिन शिंदे लसीकरण नियोजनबद्ध होण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून उत्तम काम करीत आहेत.