दापाेलीत लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांचा गाेंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:59+5:302021-06-09T04:38:59+5:30
दापोली : दापोलीत कोरोना लसचा तुटवडा जाणवत असून दुसरीकडे लसीकरण केंद्रावर योग्य नियोजन नसल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा ...
दापोली : दापोलीत कोरोना लसचा तुटवडा जाणवत असून दुसरीकडे लसीकरण केंद्रावर योग्य नियोजन नसल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ लस नेमकी कोणत्या वयोगटासाठी आहे याचा उल्लेखच नसल्याने दापाेलीत साेमवारी लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला़
ग्रामीण व शहरी भागासाठी काेव्हॅक्सिजनचा दुसरा डोस साेमवारी देण्यात आला़ हा डोस घेण्यासंदर्भात सर्वांना मेसेज आले़ त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील व ४५ पुढील नागरिक पहाटे ५ वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर रांग लावून उभे होते़ परंतु, १० वाजता त्यांना ही लस ४५ वर्षे गटावरील लोकांना असल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे पहाटेपासून उपाशीपोटी रांगेत उभे असलेल्या नागरिकांचा पारा चढला़ त्यांनी याबाबत आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला़ त्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर गाेंधळ निर्माण झाला हाेता़
कोणत्या वयोगटासाठी लस आहे याची माहिती देण्यात न आल्याने १८ ते ४४ व ४५ पेक्षा अधिक वयाचे लोक लस घेण्यासाठी आले हाेते़ प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे़ दापोली शहरासह काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी गेलेल्या लोकांनी गोंधळ घालत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पाढाच वाचला़ प्रशासनाने लसीकरण मोहीम गतिमान करण्याबरोबरच त्रुटीसुद्धा दूर कराव्यात, कोणतीही उणीव राहू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे संतप्त नागरिकांनी बाेलून दाखविले़
---------------------
लसीकरणाबाबत याेग्य माहिती न दिल्याने दापाेलीत लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी गाेंधळ घातला हाेता़