उन्हामुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:30 AM2021-03-18T04:30:52+5:302021-03-18T04:30:52+5:30
रत्नागिरी : मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक हैराण होत ...
रत्नागिरी : मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक हैराण होत आहेत. सतत बदलत्या वातावरणामुळे तापसरी, पित्त, खोकला आदी आजार बळावले आहेत. सध्या नागरिक शीत पेयांचा आधार शोधत आहेत.
जागतिक ग्राहक दिन
चिपळूण : संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेज, लायन्स क्लब यांच्यावतीने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. लायन्स क्लब अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर तसेच संजीवनी संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाघुळकर यावेळी उपस्थित होते. मांडवकर यांनी जागतिक ग्राहक दिनाचे महत्व तसेच ग्राहकांचे हक्क, कर्तव्य आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या लाटेचा धोका
खेड : तालुक्यात काही दिवसांपूर्वी अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. सध्या सर्वत्रच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये सध्या भीती व्यक्त होत आहे. असे असतानाही काही नागरिकांकडून कोरोनाबाबतचे नियम पाळले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
पावसाचा अंदाज
रत्नागिरी : येत्या गुरुवारपासून (१८ मार्च) राज्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारपासून राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तीन दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सिद्धी चाळके प्रथम
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ ऑनलाईन कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात विविध कनिष्ठ महाविद्यालयातील २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सिद्धी चाळके हिने प्रथम क्रमांक पटकावला.
खोदलेला रस्ता दुरुस्त
रत्नागिरी : शहरातील माळनाका ते जेलरोड या पर्यायी रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरुन ये-जा करताना त्रासदायक होत होते. परंतु आता खोदलेला चर खडीने भरण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
हातखंबा : येथील गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्या मंदिरमध्ये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख अतिथी हातखंबा विद्यालयाच्या महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा अंजली शिंदे उपस्थित होत्या.
ग्रामपंचायतीला देणगी
रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथील ग्रामपंचायतीला पाणीटंचाईच्या काळात समस्या उद्भवू नये यासाठी माजी सरपंच विनोद झाडगावकर यांनी स्वखर्चाने बोअरवेल खोदून दिली आहे. सदस्या अनुश्री आपटे यांनी ५ हजार लिटरची टाकी तर विनायक हातखंबकर, बांधकाम व्यावसायिक विशाल शिंदे यांनी प्रत्येकी २ हजार लिटरची टाकी दिली आहे.