रत्नागिरीत ट्रॅव्हल्स एजन्सीज व इतर खर्चाच्या खोट्या पावत्या, एनसीसीच्या अधिकाऱ्यांवर अपहाराचे गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:47 PM2017-12-09T16:47:20+5:302017-12-09T16:54:01+5:30
ट्रॅव्हल्स एजन्सीज व इतर खर्चाच्या खोट्या पावत्या तयार करुन त्याआधारे ४ लाख ७६ हजार ९५० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा संगनमताने अपहार केल्याप्रकरणी एन. सी. सी.च्या दोन अधिकाऱ्यांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. सी. सी. भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याने अन्य दोन शिक्षकांचेही धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी : ट्रॅव्हल्स एजन्सीज व इतर खर्चाच्या खोट्या पावत्या तयार करुन त्याआधारे ४ लाख ७६ हजार ९५० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा संगनमताने अपहार केल्याप्रकरणी एन. सी. सी.च्या दोन अधिकाऱ्यांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. सी. सी. भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याने अन्य दोन शिक्षकांचेही धाबे दणाणले आहेत.
तक्रारदार फय्याज दाऊद मुजावर यांनी दोन महाराष्ट्र नेव्हल युनिट एन. सी. सी. रत्नागिरी यांच्या विरुध्द एन. सी. सी. कॅम्पमध्ये अपहार केल्याप्रकरणी लोकआयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार लोकआयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
एन. सी. सी. भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत दोन महाराष्ट्र नेव्हल युनिट एन. सी. सी. कार्यालयाकडून जुलै २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ५ वेळा कॅम्प पूर्व समुद्री प्रशिक्षण, दि. ६ ते १६ डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये कॅम्प पूर्व रेकी, दि. १८ ते २७ जानेवारी २०१६ या कालावधीत प्री मेन्यु कॅम्प तसेच दि. २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत मेन्यु कॅम्प आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण व कॅम्प कालावधीत तत्कालिन कमांडिंग आॅफिसर विध्देश उंदिरे आणि तत्कालीन लिडिंग स्टोअर्स असिस्टंट आशिष कुमार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बोटींच्या, ट्रॅव्हल्स एजन्सीच्या व इतर खर्चाच्या खोट्या पावत्या तयार केल्या होत्या.
खोट्या पावत्यांच्या आधारे ४ लाख ७६ हजार ९५० रुपयांपेक्षा अधिक शासकीय रकमेचा अपहार केला होता. हे गुन्हेगारी स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश गुरव यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार शहर पोलिसांनी विध्देश उंदिरे आणि आशिष कुमार यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.